येत्या २० जुलैला अंधेरीत मुंबई काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन

By मनोहर कुंभेजकर | Published: July 18, 2023 07:43 PM2023-07-18T19:43:36+5:302023-07-18T19:43:44+5:30

मुंबई- देशामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईने जनता होरपळत असताना त्याकडे दुर्लक्ष करून फक्त सत्तेच्या राजकारणात व्यस्त असलेल्या शिंदे व फडणवीस ...

Anti-inflation protest by Congress in Andheri, Mumbai on 20th July | येत्या २० जुलैला अंधेरीत मुंबई काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन

येत्या २० जुलैला अंधेरीत मुंबई काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन

googlenewsNext

मुंबई- देशामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईने जनता होरपळत असताना त्याकडे दुर्लक्ष करून फक्त सत्तेच्या राजकारणात व्यस्त असलेल्या शिंदे व फडणवीस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात येत्या गुरुवार दि,२० जुलै रोजी मुंबई काँग्रेसतर्फेअंधेरी पश्चिम स्थानकाबाहेर दुपारी ३ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाची घोषणा मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत केली. 

देशामध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सोबत आता रोजच्या जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व भाज्यांच्या दरांमध्ये देखील प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. या प्रचंड महागाईमुळे राज्यातील सर्वसामान्य गरीब जनता होरपळून निघाली आहे. भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत. आले ४०० रुपये किलो, टोमॅटो १६० रुपये किलो, फ्लॉवर १००  रुपये किलो, लसूण १३० रुपये किलो, कोथिंबिर जुडी २०० रुपये प्रति जुड़ी, मिरची २०० रुपये किलो, पडवळ ८० रुपये  आणि भेंडी ७० रुपये प्रति किलो इतकी महाग झाली आहे. 

भाज्यांच्या दरांमध्ये सरासरी ७० ते ८० रुपयांनी वाढ झालेली आहे. डाळींच्या किमतीत सुद्धा वाढ झालेली आहे. तूरडाळ - १४० रुपये किलो, ब्रँडेड तूरडाळ -२१९  रुपये किलो इतकी महागली आहे. घरगुती गॅस सिलेंडर तर ११०० रुपयांच्या पार पोहचला आहे. गरीब जनतेचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. पण असे असताना सुद्धा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार फक्त फोडाफोडीचे राजकारण करण्यात आणि कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करण्यासाठी षडयंत्र करण्यात व्यस्त आहे. 

या आंदोलनामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा.वर्षा गायकवाड यांच्या सोबत माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, आमदार अमीन पटेल, आमदार अस्लम शेख व आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार मधू चव्हाण, माजी आमदार अशोक जाधव व माजी आमदार बाबा सिद्दीकी, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अनिशा बागुल तसेच आजी माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. 

Web Title: Anti-inflation protest by Congress in Andheri, Mumbai on 20th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.