कोणीही करा, धारावीचा विकास आमच्या पद्धतीने करा; आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:53 PM2024-11-27T15:53:01+5:302024-11-27T15:54:43+5:30
सक्रिय राजकारणात कधी याल असे वाटले होते का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, आपल्या काैटुंबिक राजकीय पार्श्वभूमीमुळे मी सातत्याने जनमानसात येतच होते.
मुंबई :
धारावी पुनर्वसन प्रकल्पात स्थानिकांना विस्थापित करून अन्यत्र पाठवण्याला आमचा विरोध असून धारावीकरांचे आहे त्याच ठिकाणी योग्य पुनर्वसन व्हावे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही लढत राहणार, असा निर्धार धारावी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी व्यक्त केला. आ. गायकवाड यांनी मंगळवारी मुंबई लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
सक्रिय राजकारणात कधी याल असे वाटले होते का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, आपल्या काैटुंबिक राजकीय पार्श्वभूमीमुळे मी सातत्याने जनमानसात येतच होते. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. परंतु थेट राजकारणात आपण येऊ असे वाटले नव्हते. आता वर्षा गायकवाड या खासदार झाल्यामुळे धारावीकरांच्या सेवेसाठी आपल्याला मैदानात उतरावे लागले आणि धारावीकरांनीही अलोट प्रेम देऊन विजयी केले, त्याबद्दल आपण त्यांचे कायम कृतज्ञ राहू, असे त्या म्हणाल्या. आपण वैद्यकीय क्षेत्रात एका रुग्णालयात प्राध्यापक म्हणून काम करत होतो, त्यामध्ये आनंद होता. यापुढे वैद्यकीय क्षेत्रात काम करायला आवडेल. मात्र आता जनसेवा ही तितकीच महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
धारावीच्या विकासासाठी काय संकल्प आहे?
धारावीतील विकासासाठी आपण सप्तसूत्री तयार केली असून त्यानुसार स्वच्छता आणि आरोग्य याला प्राधान्य दिले आहे. सातत्याने स्वच्छता व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत. तर, धारावीत मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू करून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा संकल्प आहे. धारावीत अनेक छोटे-छोटे उद्योजक कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू मॉलमध्ये प्रदर्शित करून त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कमी दाबाने पाणी येण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळे हा प्रश्न महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने सोडवणार आहे. मुलांसाठी रोबोटिक लॅब, अभ्यासिका याला प्राधान्य देत आहोत.
लाडकी बहीण योजनेचा काय परिणाम झाला?
माझ्या मतदारसंघात फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. काही विरोधकांनी थेट महिलांना धमकावून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी मतदान केले.
धारावीच्या पुनर्विकासाबाबत तुमची काय भूमिका आहे?
धारावीच्या पुनर्विकासासंदर्भात आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. धारावीतील लोकांचा आहे त्याच ठिकाणी योग्यरित्या पुनर्विकास झाला पाहिजे. त्यांना कुठेही बाहेर फेकलेले आम्ही सहन करणार नाही. विकास कोण करतेय, यापेक्षा विकास कसा होतोय, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.