अर्णब गोस्वामी यांना आधी समन्स बजावा, उच्च न्यायालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 01:31 AM2020-10-20T01:31:52+5:302020-10-20T06:54:38+5:30
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आरजी आउटलिअर मीडिया प्रा. लि. आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. (Arnab Goswami)
मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आरोपी करणार असाल तर आधी त्यांना समन्स बजावा. गोस्वामी यांनीही पोलिसांना तपासात सहकार्य करावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सोमवारी दिले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने या तपासासंबंधीचे कागदपत्रे ३ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश तपास अधिकाऱ्यांना दिले.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आरजी आउटलिअर मीडिया प्रा. लि. आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या प्रकरणाचा तपास योग्य व नि:पक्षपातीपणे व्हावा, यासाठी हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा. तसेच याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत तपासास स्थगिती द्यावी आणि याचिकाकर्त्यांविरुद्ध कठोर कारवाई करू नये, अशी अंतरिम मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली. गोस्वामी यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी तर राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.
तपासासंदर्भात महत्त्वाची -
माहिती पोलिसांनी देऊ नये. तर प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे त्यांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले. या याचिकेवरील सुनावणी ५ नोव्हेंबर रोजी ठेवली.