४०० शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केल्याने होते नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 10:43 AM2019-12-05T10:43:34+5:302019-12-05T10:46:12+5:30
मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्याने काही शिवसैनिक नाराज झाल्याचं समोर येत आहे.
मुंबई - राज्यातील सत्तानाट्य झाल्यानंतर शिवसेनाकाँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत सरकार महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्याने काही शिवसैनिक नाराज झाल्याचं समोर येत आहे. धारावी येथील ४०० शिवसैनिकांनी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. भ्रष्ट आणि विरोधी पक्षासोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्याने हे कार्यकर्ते नाराज होते.
Mumbai: Around 400 Shiv Sena workers joined BJP at an event organised in Dharavi, yesterday. #Maharashtrapic.twitter.com/zGBAVH0zDr
— ANI (@ANI) December 5, 2019
भाजपात सहभागी झालेले शिवसैनिक रमेश नाडार यांनी सांगितले की, शिवसेना भ्रष्टाचारी पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले. हिंदू पक्षाविरोधात शिवसेनेने हातमिळवणी केल्याने आम्हाला स्वत:ला फसवणुकीची भावना निर्माण झाली. फक्त सत्तेसाठी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेत अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. मागील ७ वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढत आहोत. निवडणुकीच्या काळात आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागितली. पण आता त्यांना कोणतं तोंडाने सामोरे जाणार? आम्ही प्रामाणिकपणे लोकांकडे मतं मागितली होती अशा शब्दात रमेश नाडार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचा तर भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. काही शिवसैनिकांनी सामुहिक राजीनामेही दिले होते. मात्र, निकालानंतर वेगळीच गणिते आकारास आली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. नेमका हाच मुद्दा काही शिवसैनिकांना आवडलेला नाही. यापूर्वी रमेश सोळंकी नावाच्या शिवसैनिकाने मंगळवारी रात्री पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
सोळंकी यांनी म्हटलं होतं की, मी शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाचा राजीनामा देत आहे. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझे मत जाणून घ्यायचे होते. आता मला माझी भूमिका मांडायची आहे. जो माझ्या श्रीरामाचा नाही (काँग्रेस), तो माझ्या काही कामाचा नाही आहे असा आरोप त्यांनी केला होता.