अर्णब गोस्वामींच्या चॅटमधील आणखी एक गंभीर बाब उघड, काँग्रेसकडून कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 07:14 PM2021-01-24T19:14:42+5:302021-01-24T19:15:39+5:30
arnab goswami : अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करुन सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी काँग्रेसने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
मुंबई : मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅटमधील अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. ५१० पानांच्या या चॅटमध्ये न्यायाधिशांना विकत घेण्याची भाषा केली आहे, हे अत्यंत गंभीर असून न्यायव्यवस्थचे स्वातंत्र्य अबाधित होते त्याला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. न्यायाधिशांनी स्वेच्छाधिकारने याची दखल घेणे गरजेचे होते परंतु जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू नये यासाठी चौकशी होणे गरजेचे असून त्यासाठी अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करुन सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी काँग्रेसने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज भेट घेऊन ही कारवाईची मागणी केली. यावेळी अतुल लोंढे म्हणाले की, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी दाखल केलेला गुन्हा पाटण्यातून मुंबईला हलवण्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. ती मान्य करण्यात आली नाही, त्यामागे अर्नब गोस्वामी होते, असे या चॅटमधून दिसते.
याचबरोबर, टीआरपी प्रकरणात दिग्गज वकील न्यायालयात बाजू मांडणार आहेत, तुम्ही न्यायाधिशांना विकत घ्या, असा सल्ला देण्यात आलेला आहे. या लोकांनी न्याय व्यवस्थेतही घुसखोरी केली असून न्यायाधीशही विकत घेतले जाऊ शकतात, असा संदेश जनतेत जात आहे. यातून सरन्यायाधीश यांच्या कारकिर्दीवरही बोट ठेवल्यासारखे आहे. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य व स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या चॅटमध्ये हरकत घेण्यासारखे अनेक मुददे आहेत. न्यायव्यवस्थेला स्वतःच्या स्वार्थासाठी खरेदी करता येऊ शकते, असे त्या चॅटमध्ये आलेले आहे ते अत्यंत गंभीर आहे. न्याय पालिकेवर लोकांचा विश्वास आहे. त्यातील न्यायाधीश विकत घ्या, असा सल्ला देणे अत्यंत गंभीर असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन अनिल देशमुख यांनी यावेळी दिले आहे.