बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूकच होती- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 07:27 PM2019-10-11T19:27:01+5:302019-10-11T19:27:11+5:30
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बाळासाहेबांना त्याकाळी अटक करण्यात आलेल्या कृत्यावर मोठा खुलासा केला आहे. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली. बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती. त्याकाळामध्ये आमचंही स्वतःचं मत होतं. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी तसं करण्यात आलं.
वास्तविक तसं कोणाच्याच बाबतीत करू नये, आम्ही त्यावेळी संबंधित व्यक्तीला विचारलं की असं का करताय, तेव्हा ते म्हणाले, आम्ही विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घेणार आहोत. अजित पवारांनी बाळासाहेबांना अटक केलेल्या मुद्द्यावर मोठा खुलासा केला आहे. तसेच ते म्हणाले, कुठल्याही पक्षात काम करत असताना पुढे कोणाला संधी द्यायची, हे पक्षानं ठरवायचं असतं, व्हिजन असलेल्या व्यक्तीकडे नेतृत्व दिलं पाहिजे. राज ठाकरे स्पष्ट बोलतात, पण आजच्या घडीला त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्तेचा पुरेपूर फायदा घेतला.
माझ्या कारकिर्दीला साडेचार वर्षं झाल्यानंतर मी वेगळा विदर्भ करेन, असं मुख्यमंत्री म्हणाले होते, वेगळ्या राज्याचा ठराव करून तेलंगणासारखं विदर्भ वेगळं राज्य करणार होते, तसेच आमचं सरकार इथे पण असेल आणि तिथे पण असेल, कालांतरानं त्यांना वेगळ्या विदर्भाऐवजी पूर्ण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहण्याची इच्छा झाली, असंही अजित पवार म्हणाले आहेत. तसेच ते म्हणाले, खडसेंनी विरोधी पक्षाची भूमिका कणखरपणे मांडली. खडसेसाहेब काम करत असताना टोकाची भूमिका घेऊन जायचं नसतं, सावध भूमिका त्यांनी घ्यायला हवी होती. खडसेंनी दुसऱ्या क्रमांकाचं स्थान स्वीकारलं असतं तर आज अशी अवस्था त्यांची झाली नसती.