ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभेसाठी जुळून येणार ‘राज’ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 10:07 PM2019-08-22T22:07:00+5:302019-08-22T22:07:54+5:30

‘राज ठाकरे’ नावाची ही जादू म्हणावी की कोणी तरी घडवून आणलेल हे नाट्य आहे.

Article on ED inquiry of Raj Thackeray before upcoming assembly election | ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभेसाठी जुळून येणार ‘राज’ योग!

ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभेसाठी जुळून येणार ‘राज’ योग!

Next

विनायक पात्रुडकर 

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी झाली. ही चौकशी सुमारे सात तास सुरू होती. ईडी कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. या कार्यालयात याआधी अनेक दिग्गज चौकशीसाठी येऊन गेले आहेत.  पण आजच्या एवढा तणाव याआधी कधीच या कार्यालयाजवळ नव्हता. मुंबईतही ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. या चौकशीबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. हा तणाव, ही उत्सुकता नेमकी कोणासाठी आणि कशासाठी, असा प्रश्न पडणे स्वभाविक आहे. कारण जो पक्ष डबघाईला लागला आहे त्या पक्षाचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, नेते, पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. पक्षाचा कोणताच अजेंडा नाही. असे असताना एवढी चर्चा का व कशासाठी?

 ‘राज ठाकरे’ नावाची ही जादू म्हणावी की कोणी तरी घडवून आणलेल हे  नाट्य आहे. काहीही असो या चौकशीचा फायदा नक्कीच राज ठाकरे यांना होणार आहे. दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत. राज यांना आघाडीत घेण्यास विरोध आहे. त्यांच्या पक्षाचे अस्तित्त्व सध्या तथातथाच आहे ,अशा परिस्थितीत आयती प्रसिद्धी मिळणे हे नक्कीच फायद्याचे असते. ही संधी साधा, असे राज ठाकरे यांना सांगायला नको. चौकशीचा एकूणच विचार केला तर ही चौकशी तूर्त तरी प्राथमिक स्वरूपात आहे. चौकशीचा निष्कर्ष काय निघेल माहिती नाही, तरीही भाजप सरकारवर सर्व बाजूने टीका होत आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी तर या प्रकरणात  शिवाजी महाराज यांची आठवण करून दिली. ही भूमी शिवाजी महाराजांची आहे. त्याकाळात शिवाजी महाराजांसोबत त्यांचे कुटुंब होते. त्यामुळे राज यांच्या सोबत त्यांचे कुटुंब असणे स्वाभाविकच आहे, कारण ही महाराष्ट्राची परंपरा आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली. काँग्रेसचा तर प्रत्येक नेता राज यांच्या बाजूनेच बोलतो आहे. शिवसेना पक्षप्रमुख व थोरले बंधू उद्धव ठाकरे देखील राज यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. सर्वच जण राज यांच्या बाजूने बोलत असल्याने त्यांच्याविषयी जनमानसात सहानभूती निर्माण होणार हे निश्चित. तसा राज यांचा राजकीय प्रवास बघितला तर शिवसेनेत त्यांचा दरारा होता. शिवसेना सोडल्यानंतर मनसे प्रमुख म्हणून त्यांनी त्यांच्या वकृत्त्व कौशल्याने अवघा महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. पुढे मात्र हे कौशल्य फक्त गर्दी जमवण्यापुरते राहिले. राज यांच्या सभांना तुडुंब गर्दी होते. या गर्दीच्या निम्मि मतेही मनसेला मिळत नाहीत. असे असले तरी जनमानसात राज यांच्याविषयीची उत्सुकता अजूनही टिकून आहे. ईडीच्या चौकशीने ही उत्सुकता दाखवून दिली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी़ चिदंबरम यांची अटक व त्यांची न्यायालयातील हजेरी याविषयी मराठी माध्यमांनी क्वचित बातमी दाखवली.  त्या बातमीत आज स्वारस्य कोणाचेच नसावे. याउलट राज यांची चौकशी दिवसभर चॅनेलला सुरू होती. या चौकशीचे भांडवल राज करतीलच हे नव्याने सांगायला नको. काहीही असो राज ठाकरे यांच्या नशिबी राजयोग आहे, असे जे म्हटले जाते ते काही अंशी खरे असावे कारण काहीही न करता आज ते पुन्हा चर्चेत आले आहेत. 

सर्वसामान्यांना भुरळ पडावी अशी ही भावनिक चर्चा आहे़ ही भावनिक चर्चा मतपेटीत उतरवण्याचे आवाहन आता राज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर आहे आज सुदैवाने राज ठाकरे यांनी कोणताही हिंसक मार्ग न पत्करण्याचे आवाहन केले होते त्याचाही फायदा राज ठाकरे यांना होण्याचे शक्यता आहे सध्या फारसा चर्चेत नसलेला मनसे पक्ष यानिमित्ताने का होईना पुन्हा चर्चेच्या अग्रस्थानी आला आहे त्याचा फायदा करून घेण्याचे कौशल्य राज ठाकरे नक्कीच दाखवतील त्यातच येत्या विधानसभेत  त्यांचा फायदा होऊ शकेल अर्थ द्या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत 
 

Web Title: Article on ED inquiry of Raj Thackeray before upcoming assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.