Aryan Khan Drugs Case: पुन्हा वकील बदलले; आर्यन खानसाठी आता माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी मांडणार बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:33 PM2021-10-26T12:33:17+5:302021-10-26T12:34:27+5:30
Aryan Khan Drugs Case: मुंबई उच्च न्यायालयाकडून तरी आर्यन खानला जामीन मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई:मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. या सुनावणीसाठी पुन्हा एकदा वकील बदलला असून, आर्यन खानची बाजू आता थेट भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी मांडणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाकडून तरी आर्यन खानला जामीन मिळणार का? असा प्रश्न निर्माण झालेला असताना शाहरुख खान मात्र आपल्या मुलाला सोडवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आर्यन खानसाठी नव्याने वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे यांच्यानंतर आता थेट भारत सरकारचे माजी अॅटर्नी जनरल आर्यन खानची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडणार आहेत.
माजी अॅटर्नी जनरल आर्यन खानची बाजू मांडणार
केंद्र सरकारचे माजी अॅटर्नी जनरल अर्थात एजीआय मुकुल रोहतगी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडणार आहेत. उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यामध्ये सुनावणीमध्ये त्याची ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी कायम केली होती. त्यामुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढला होता.
दरम्यान, येत्या १ नोव्हेंबरपासून न्यायालये दिवाळीमुळे सुट्टी असताना बंद राहणार आहेत. पुढचे दोन आठवडे न्यायालय बंद राहणार असल्यामुळे या तीन दिवसांत आर्यन खानला जामीन न मिळाल्यास त्याचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम थेट १५ नोव्हेंबरपर्यंत वाढू शकतो. २९ ऑक्टोबरला न्यायालयाचे कामकाज सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर ३० आणि ३१ ऑक्टोबरला शनिवार आणि रविवार असल्याने न्यायालयात सुनावणी होणार नाही. येत्या ३ दिवसात आर्यनच्या जामीन अर्जाचा निकाल जाहीर न झाल्यास आर्यन खानला कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जाता येणार नाही. १५ नोव्हेंबरपर्यंत त्याला जेलमध्येच राहावे लागेल.