Aryan Khan Drugs : थोबाड फुटलं... तेव्हापासून भाजपची वाचा गेलीय, आर्यन प्रकरणावरुन शिवसेनेची जहाल टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 07:54 AM2021-11-22T07:54:58+5:302021-11-22T08:31:57+5:30
स्टारपुत्र आर्यन खानच्या विरोधात अमली पदार्थ बाळगल्याचा, सेवन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे.
मुंबई - अभिनेता आर्यन खानप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानंतर शिवसेनेनं भाजपवर जोरदार प्रहार केलाय. आर्यन खान प्रकरणात एका केंद्रीय तपास यंत्रणेचे थोबाड फुटले आहे. इतरांचेही लवकरच तसे होईल. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये, असे म्हणत सामनातून खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तसेच, राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईला भाजपप्रणीत कट कारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
स्टारपुत्र आर्यन खानच्या विरोधात अमली पदार्थ बाळगल्याचा, सेवन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या मोबाईलवरील संभाषणातही कटकारस्थानासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले. याचा अर्थ एनसीबीच्या टोळीने हा सर्व बनाव रचला आणि आर्यन खानसह इतर मुलांना वीस-पंचवीस दिवस नाहक तुरुंगात डांबले. आर्यनविरोधात एनसीबीच्या आरोपात तथ्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण असेल तर या पोरांना अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा. एनसीबीच्या वादग्रस्त कारवायांच्या खोटेपणाचे रोज नवे पुरावे समोर येत आहेत व त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा व आदर साफ धुळीस मिळाला आहे, असे शिवसेनेनं म्हटलं आहे.
दरम्यान, फक्त महाराष्ट्रासारख्या राज्यात डेरा टाकून केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरू केलेले नसते उद्योग हेच मोठे कारस्थान दिसते. या कारस्थानाची किंमत चुकवावी लागेल, असे शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते सांगतात. त्यामागची संतप्त भावना हीच लोकभावना आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात जो खेळ चालवला आहे, त्याची पोलखोल रोजच असल्याचे शिवसेनेनं म्हटलंय.
एनसीबी म्हणजे खंडणी उकळणारे टोळभैरवच
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हे महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करून खंडणी, गाडी-घोडे उकळणारे टोळभैरवच बनले होते. भारतीय जनता पक्षाचे लोक या टोळभैरवांच्या खंडणीखोरीचे समर्थन करीत होते. एनसीबीच्या टोळीचे कारनामे पुराव्यांसह समोर आणण्याचे चोख काम मंत्री नवाब मलिक यांनी केले हे महाराष्ट्रावर मोठे उपकारच झाले. स्वतः मलिक यांच्या जावयावर याच टोळधाडीने खोटे गुन्हे दाखल करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. फिल्मस्टार, त्यांची मुले, व्यापारी, राजकारण्यांचे नातेवाईक यांना अशा प्रकरणात फसवून खंडण्या उकळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात महाराष्ट्रात रोष निर्माण झाल्याचे राऊत यांनीम म्हटलं आहे.
तेव्हापासून भाजपची वाचा गेली
नवाब मलिक यांनी याच खोटेपणावर हल्ला केला आहे. शेतकरी आंदोलन, महागाईविरुद्धचा रोष यावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी म्हणे 'क्रूझ शिप ड्रग्ज' प्रकरणात आर्यन खानला अडकवले. तरीही त्यात 25 कोटींच्या खंडणीचा विषय धक्कादायक आहे. एनसीबीचे अधिकारी पाव-दोन ग्रॅम चरस पकडून मोठाच तोरा दाखवीत होते, पण त्यांची अनेक बाबतीतील बनावटगिरी नवाब मलिक यांनी सिद्ध केली आहे, तेव्हापासून भारतीय जनता पक्षाची वाचा गेली आहे. ईडीने मुंबईत केलेल्या कारवाया व धरपकडी 'एनसीबी छाप'च आहेत, असा थेट आरोप शिवसेनेनं केलाय.