Asaduddin Owaisee: अजित पवारांनी मला विचारुन पहाटे शपथ घेतली का?, ओवेसींचा राष्ट्रवादीला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 12:54 PM2022-05-01T12:54:59+5:302022-05-01T13:09:20+5:30
महाविकास आघाडीसोबत येण्याची एमआयएमची तयारी असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू होती.
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला असून राजकीय वर्तुळात मनसेचीच चर्चा आहे. एमआयएम ही भाजपची बी टिम असून मनसे ही भाजपची सी टिम असल्याचा आरोप आता सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एमआयएमवर भाजपला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. आता, जयंत पाटील यांच्या आरोपावर स्वत: असदुद्दीन ओवेसींनी प्रत्त्युत्तर दिलंय. तसेच, अजित पवारांनी मला विचारुन पहाटेची शपथ घेतली होती का? असा सवालही त्यांनी विचारला.
महाविकास आघाडीसोबत येण्याची एमआयएमची तयारी असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू होती. एमआयएम महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार असल्याचा निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. अशा परिस्थितीत, 'आपण भाजपविरोधी आहोत आणि भाजपाला पराभूत करण्यास उत्सुक आहोत हे एमआयएमला कृतीतून सिद्ध करावं लागेल'. एमआयएम ही भाजची बी टिम नाही, हे अगोदर त्यांना सिद्ध करावं लागेल, असं मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले होते. यासंदर्भात, औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या असदुद्दीन औवेसींना प्रश्न विचारण्यात आला होता.
औवेसींनी जयंत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना अजित पवारांना लक्ष्य केलं. राष्ट्रवादीने भाजपसोबत लग्न केलं, त्यावेळी अजित पवारांनी मला विचारुन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती का? असा सवाल औवेसी यांनी विचारला. तसेच, माझं नाव ऐकलं की अनेकांना भिती वाटते, त्यामुळे ते भाजपसोबतचा आरोप करतात. वास्तविक, सध्या सर्वच पक्षात हिंदूत्त्वाचा पुरस्कर्ता कोण? हे दाखविण्याची स्पर्धा लागली आहे. हिंदुत्त्वाचा मुद्दा आम्हीच घेऊन आहोत, हे दाखवत आहेत. राष्ट्रवादीनेच मुस्लीम मतदारांचा विश्वासघात केला आहे. भाजप-शिवसेनेविरोधात मतं मागितली. मात्र, सत्तेसाठी शिवसेनेला जवळ केलं. मुख्यमंत्री विधानसभेत बाबरी मस्जिद आम्ही पाडल्याचं सांगतात. मग, त्या पक्षासोबत हे सेक्युलर काँग्रेस-राष्ट्रवादीवाले कसे सरकारमध्ये बसले?, असा सवालही ओवेसींनी केला आहे.
इम्तियाज जलील यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीसाठी असुदुद्दीन ओवेसी औरंगाबाद येथे आले होते. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील आणि औरंगाबादमधील विविध प्रश्नांवर मत व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करताना, शिवसेनेलाही लक्ष्य केलं. राज ठाकरेंच्या मुद्द्यावर बोलताना सरकारने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याची जबाबदारी चोखपणे निभावली पाहिजे, असे ते म्हणाले. तर, दोन भावांमधील हे भांडण आहे, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.