पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' शब्दावर अशोक चव्हाणांचा आक्षेप, व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 04:41 PM2021-02-08T16:41:24+5:302021-02-08T17:38:36+5:30
Ashok Chavan : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) राज्यसभेतील भाषणावर अशोक चव्हाण यांनी केली टीका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार शरसंधान केलं. यावेळी मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य करत देशात सध्या आंदोलनजीवी जमातीची पैदास झाल्याचं म्हटलं. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आक्षेप घेतला आहे.
पंतप्रधानांनी वापरलेला आंदोलनजीवी शब्द अजिबात स्वीकारार्ह नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी मोदींच्या भाषणानंतर एक ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांचा 'आंदोलनजीवी' हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही 'जीवी' नाही, तर मानवतेला 'जीवि'त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 8, 2021
"पंतप्रधानांचा 'आंदोलनजीवी' हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही 'जीवी' नाही, तर मानवतेला 'जीवि'त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे", असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
काय म्हणाले होते मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना विरोधकांना उद्देशून आंदोलनजीवी असा शब्दप्रयोग केला होता. "आपण आतापर्यंत 'बुद्धीजीवी' असा शब्द ऐकला होता. पण सध्या देशात 'आंदोलनजीवी' जमातीची पैदास झाली आहे. देशात काहीही झालं की हे आंदोलनजीवी लोक तिथं पोहोचतात. कधी ते पडद्याआड असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून सावध राहायला हवं", असं नरेंद्र मोदी म्हणाले होते.
आंदोलनजीवी टोळीपासून बचाव करा, नवा FDI म्हणजे फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी; पंतप्रधानांचा निशाणा
"जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचं आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही," असंही मोदी म्हणाले.