“विशाळगड हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करा”; अस्लम शेख यांची पोलीस महासंचालकांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:32 PM2024-07-16T16:32:41+5:302024-07-16T16:34:30+5:30
Congress Aslam Shaikh News: एका निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर एवढा अकांडतांडव करण्याची काय गरज आहे, असा सवाल अस्लम शेख यांनी केला आहे.
Congress Aslam Shaikh News: विशाळगडावर घडलेला हिंसाचार हे राज्यसरकारचं अपयश असून या हिंसाचार प्रकरणातील दोषींवर कठोरात-कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अस्लम शेख व अमिन पटेल यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली.
विशाळगड येथील किल्ल्यावर व गजापूर आणि मुसलमानवाडीतील घरांवर दगडफेक, हल्ले करून जाळपोळ केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसात सुमारे ५० जणांवर सोमवारी गुन्हे दाखल झाले. त्यातील २१ जणांना अटक केली असून, या जाळपोळीत ५६ कुटुंबांचे प्रापंचिक साहित्याचे तसेच ७ कार, ३ दुचाकी मिळून सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यातच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आमदार अस्लम शेख व अमिन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली.
एका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर एवढा अकांडतांडव करण्याची काय गरज आहे?
पत्रकारांशी बोलताना अस्लम शेख म्हणाले की, अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी नियम व कायदे आहेत. एका निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर एवढा अकांडतांडव करण्याची काय गरज आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केले, त्या महाराष्ट्रात महिलांना, बालकांना पोलीसांसमोर हल्ले होणे ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका शेख यांनी केली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संपूर्ण जग प्रेरणा घेते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला. मात्र त्याच शिवरायांच्या भूमित महिलांवरती अत्याचार होत आहेत. पोलिसांना मारहाण होत आहे. जर पोलिसांचे खच्चीकरण झाले तर जनतेने कोणाकडे अपेक्षेने बघायचे, अशी विचारणा शेख यांनी केली.