अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द 

By जयंत होवाळ | Published: April 19, 2024 08:07 AM2024-04-19T08:07:02+5:302024-04-19T08:07:50+5:30

भायखळ्याच्या दगडी चाळीतून कारभार चालवत २००४ साली विधानसभेत पोहोचलेला गवळी नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाला.

Assembly Speaker's word to make Arun Gawli's daughter Mayor | अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द 

अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द 

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
: मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतील सेनेचे अध्यक्ष अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी यांना मुंबईच्या महापौर होईपर्यंत पाठिंबा देणार असे जाहीर केले आहे. यामागे डॅडीला मानणाऱ्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा हेतू दिसत असला, तरी गवळी यांचा पूर्वीसारखा दबदबा कितपत आहे? नार्वेकरांना त्याचा फायदा होईल का अशी चर्चा सुरु झाली आहे. 

भायखळ्याच्या दगडी चाळीतून कारभार चालवत २००४ साली विधानसभेत पोहोचलेला गवळी नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाला. सुनील घाटे हे अभासेचे पहिले नगरसेवक. त्यानंतर गवळीची कन्या गीता आणि वहिनी वंदना याही नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत पोहोचल्या. गीता आरोग्य समितीच्या सभापती होत्या. स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी शिवसेनेने ‘अभासे’ची मदतही घेतली होती. 

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर  गवळीचा बोलबाला राहिला नाही. या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी ‘अभासे’ला साद घातल्यानंतर आश्चर्याचे सूर उमटले. नार्वेकर यांची लोकसभा लढण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. आता त्यांनी थेट दगडी चाळीकडे धाव घेतल्याचे दिसून आले. भायखळ्याच्या विद्यमान आ. यामिनी जाधव शिंदे गटात आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव यांचा भायखळ्यात दबदबा आहे. गीता गवळी यांनीही २०१९ साली विधानसभा लढवत १० हजार मते घेतली होती.

म्हणजे ‘अभासे’च्या १० हजार मतांकडे नार्वेकरांचे लक्ष असावे. पण ते करताना जाधव दाम्पत्याला विश्वासात घेण्यात आले आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. नार्वेकर यांच्या भूमिकेवर विरोधी पक्षांनी टीका केली, भाजपनेही थेट समर्थन केलेले नाही. नार्वेकर यांनी गवळी कुटुंबाला साद घातल्याने ‘अभासे’ मरगळ झटकून नार्वेकर यांच्यासाठी काम करेल असे दिसते.

नार्वेकर यांनी महापौरपदासाठी मला पात्र समजले याने आश्चर्याचा धक्का बसला तसेच आनंदही झाला. यापूर्वी, पालिकेत कार्यरत असताना जनतेची अनेक कामे केली आहेत. त्यामुळे लोकांसाठी कामे करू शकते असे  नार्वेकर यांना वाटत असल्याने त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला असेल. - गीता गवळी, माजी नगरसेविका

तुमच्या कुटुंबात मी एक नवीन सदस्य...
अखिल भारतीय सेनेच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील झाला आहे, हे गृहीत धरा. मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी (स्वतःला) पाठिंबा मागत नाही तर मी माझ्या बहिणीला गीता गवळी यांना मुंबईची महापौर होईपर्यंत पाठिंबा देईन. गीता गवळी, अरुण गवळी यांच्याकडून जे प्रेम ‘अभासे’च्या कार्यकर्त्यांना मिळाले, तेच प्रेम त्यांना माझ्याकडून मिळेल, अशी मी तुम्हाला खात्री देतो. - ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष

Web Title: Assembly Speaker's word to make Arun Gawli's daughter Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.