Babasaheb Purandare : 'सर्जेराव' नावाने ट्रोल झाल्यानंतर सत्यजीत तांबेचं भलं मोठं स्पष्टीकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:11 PM2021-08-03T18:11:58+5:302021-08-03T18:14:21+5:30
Babasaheb Purandare : सत्यजीत तांबे काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्यात मोठा युवकवर्ग त्यांचा फॉलोअर्स आहे. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटची दखल सोशल मीडियात चांगलीच घेतली गेली.
मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै रोजी १०० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या निमित्ताने राज्यभरातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी त्यांच्या आठवणी सोशल मीडिायातून जागवल्या. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही बाबासाहेबांची भेट घेत त्यांना भगवी शाल, पगडी आणि गुलाबांच्या फुलांचा पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. याचवेळी ठाकरे यांनी पुरंदरेंबद्दल गौरवोद्गार देखील काढले. याचदिवशी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही ट्विट करुन बाबासाहेब यांची एक आठवण सांगितली होती.
सत्यजीत तांबे काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्यात मोठा युवकवर्ग त्यांचा फॉलोअर्स आहे. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटची दखल सोशल मीडियात चांगलीच घेतली गेली. ''लहानपणी मला थोर माणसांच्या सह्या गोळा करण्याची फार आवड होती. संगमनेरला ज्या अकोलकर वाड्यात माझा जन्म झाला तेथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कायम येत असत. तेव्हाच ही सही घेतलेली. बाबासाहेबांनी आवडीने माझे नाव 'सर्जेराव' असे ठेवले होते. बाबासाहेबांना जन्मशताब्दीदिनी अनंत शुभेच्छा!, असे ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं होत. तसेच, बाबासाहेब पुरंदरेंनी केलेल्या सहीचा फोटोही त्यांनी शेअर केला होता.
लहानपणी मला थोर माणसांच्या सह्या गोळा करण्याची फार आवड होती. संगमनेरला ज्या अकोलकर वाड्यात माझा जन्म झाला तेथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कायम येत असत. तेव्हाच ही सही घेतलेली. बाबासाहेबांनी आवडीने माझे नाव 'सर्जेराव' असे ठेवले होते.
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 29, 2021
बाबासाहेबांना जन्मशताब्दीदिनी अनंत शुभेच्छा! pic.twitter.com/vGvske7KC6
या ट्विटनंतर सोशल मीडियातून त्यांना ट्रोलही करण्यात आले. सर्जेराव या नावाने त्यांची टिंगलटवाळीही करण्यात आली होती. आता, या घटनेसंदर्भात भलंमोठं पत्र लिहून सत्यजीत तांबे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, मी बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या लिखानाचे कधीही समर्थन केले नाही, असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच, ट्विटरवरील 280 शब्दांच्या मर्यादेत सर्वच भावना व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे हे पत्र लिहित असल्याचंही तांबे यांनी सांगितलं.
280 कॅरेक्टर्समध्ये भावना व्यक्त होऊ शकत नाहीत, म्हणून... pic.twitter.com/zSobmyiROp
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 3, 2021
आपल्या विचारधारेच्या लोकांकडून यंदा मी ट्रोल झालो आहे, त्यांचा मी आदर करतो. पण, विचार समजून न घेता केलेला विरोध केव्हाही वायाच जात असतो, असं मला वाटतं, असे म्हणत मी हे पत्र लिहित असल्याचे सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, मी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहास लेखनाचे कधीही समर्थन केले नाही, पण त्यांच्या वयाचा आदर ठेवून त्यांना शुभेच्छा दिल्या, असेही तांबे यांनी पत्रात सांगितलं आहे.