"बच्चू कडूंची आमदारकी रद्द झाली नाही, पण..."; काँग्रेसचा भाजपावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 01:14 PM2023-12-25T13:14:25+5:302023-12-25T13:23:09+5:30
दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख करत भाजपावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
मुंबई - नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आपली आमदारकी गमवावी लागली आहे. काँग्रेसला हा विदर्भात मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे त्यांना शिक्षा सुनावल्याच्या दुसऱ्याचदिवशी त्यांची आमदारकी रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख करत भाजपावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
नागपूर विशेष न्यायालयाने शुक्रवारी जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना शिक्षा सुनावल्यांतर दुसऱ्याच दिवशी केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना विधिमंडळ सचिवालयाने प्रसिद्ध केली. केदार यांना शिक्षा सुनावण्यात आल्याच्या २२ डिसेंबर २०२३ या दिवसापासूनच आमदारकी रद्द करण्याबरोबरच त्यांचा सावनेर विधानसभा मतदारसंघही रिक्त झाल्याचेही जाहीर करण्यात आले. त्यानंतर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत भाजपला लक्ष्य केलं आहे.
बच्चू कडू यांची आमदारकी रद्द झाली नाही,
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 25, 2023
सुधीर पारवे यांची आमदारकी रद्द झाली नाही.
मात्र सुनील केदार यांची आमदारकी तातडीने रद्द झाली.@SunilKedar1111 यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपला उभे राहू दिले नाही. त्यामुळे त्यांना संपवण्यासाठी भाजपचे हे सर्व प्रयत्न सुरू आहे. pic.twitter.com/r0hJA0HKtG
बच्चू कडू यांची आमदारकी रद्द झाली नाही, सुधीर पारवे यांची आमदारकी रद्द झाली नाही. मात्र, सुनील केदार यांची आमदारकी तातडीने रद्द झाली. कारण, सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपला उभे राहू दिले नाही. त्यामुळे त्यांना संपवण्यासाठी भाजपचे हे सर्व प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपच वडेट्टीवार यांनी केला आहे. आमदार बच्चू कडू आणि सुधीर पारवे यांना शिक्षा सुनावण्यात आली, त्यावेळी स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी २४ तासांच्या आता रद्द केली नाही. पण, सुनील केदार यांची तात्काळ रद्द होते, म्हणजे भाजपाने सुनील केदार यांनी ग्रामीण भागात भाजपा न वाढवून दिल्याचा बदला घेतल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं. तसेच, विरोधकांना आणि लोकशाही संपविण्याच्या दिशेने हे पाऊल पडत असल्याचंही ते म्हणाले.