बागेश्वर बाबाची कोटींची संपत्ती, महिन्याला कमावतात लाखो; कुठे करतात खर्च?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 08:27 PM2023-01-22T20:27:24+5:302023-01-22T20:29:01+5:30
धीरेंद्र शास्त्री यांची दर महिन्याची कमाई जवळपास ३.५ लाख रुपये इतकी आहे, शास्त्री एक कथा किंवा प्रवचन सांगण्यासाठी ८ हजार रुपये घेतात.
भक्तांच्या मनातील ओळखणाऱ्या बाबाला नागपूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते. बागेश्वर बाबा यांनी नागपूरमध्ये येऊन दरबार भरवला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हानच दिले. चमत्कार करून दाखवला तर ३० लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे श्याम मानव यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे बागेश्वर बाबा यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. पण त्यांनी एक अट ठेवलीय. ते म्हणजे नागपूरला येऊन चमत्कार करून दाखवणार नाही. तर रायपूरला तुम्हालाच यावे लागेल, असे बागेश्वर बाबाने म्हटले आहे. चमत्काराचे आव्हान स्वीकारणारे बागेश्वर बाबा नेमके कोण आहेत, त्यांची एकूण संपत्ती किती, ते महिन्याला किती रुपये कमावतात असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.
बागेश्वर बाबांचा जन्म ४ जुलै १९९६ मध्ये झाला. छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज गर्ग आहे. त्यांना तीन मुले आहेत. त्यामध्ये बागेश्वर हे सर्वांत मोठे आहेत. बागेश्वर यांचे बालपण गरिबीत गेले. बागेश्वर उर्फ धीरेंद्र कृष्ण यांनी १२ वीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांनी हळूहळू वडिलांप्रमाणेच कथा वाचन करण्यास सुरुवात केली. माझे वडील मला शिक्षणासाठी वृंदावनला पाठवू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे त्यावेळी एक हजार रुपये नव्हते, असे बागेश्वर बाबा सांगतात. मात्र, आजमित्तीला बागेश्वर बाबा महिन्याला लाखो रुपये कमावतात
धीरेंद्र शास्त्री यांची दर महिन्याची कमाई जवळपास ३.५ लाख रुपये इतकी आहे, शास्त्री एक कथा किंवा प्रवचन सांगण्यासाठी ८ हजार रुपये घेतात. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची नेटवर्थ ९ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे, यासंदर्भात झी न्यूजने वृत्त दिले आहे. दरम्यान, शास्त्री यांचं म्हणणं आहे की, ते आपल्याकडील पैशांचा वापर भुकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी करतात. तसेच ते एक गोशाळा देखील चालवतात.