बाळासाहेब ठाकरे केवळ हिंदुधार्जीणे हे अर्धसत्य, अजित पवारांनी सांगितलं पूर्णसत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 07:29 PM2023-01-23T19:29:07+5:302023-01-24T00:09:25+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे कार्य, त्यांचा विचार, त्यांचं मोठेपण देशाला माहिती आहे. जनमाणसांत प्रभाव आणि जरब असलेलं दुसरं नेतृत्त्व झालं नाही.
मुंबई - हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होत आहे. विधान भवनाकडून होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबाला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा प्रामुख्याने सहभाग होता. मात्र, ठाकरे कुटुंबीयांकडून केवळ मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच या सोहळ्याला उपस्थिती लावली. बाळासाहेब ठाकरे नावाच्या झंझावाताचं दर्शन आपण नुकतंच चित्रफितीमधून पाहिलं, असे यावेळी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. तर, बाळासाहेब ठाकरे हे केवळ हिंदुधार्जीने होते हे अर्धसत्य आहे, असेही अजित पवार यांनी म्हटलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे कार्य, त्यांचा विचार, त्यांचं मोठेपण देशाला माहिती आहे. जनमाणसांत प्रभाव आणि जरब असलेलं दुसरं नेतृत्त्व झालं नाही. बाळासाहेबांच्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात दुटप्पीपणा नव्हता. जे पोटात ते ओठात हेच त्यांचं जीवन होतं. बाळासाहेबांचे हेच गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे अजित पवार यांनी याप्रसंगी म्हटले. बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने जे करुन दाखवलं, ते नव्या पिढीसमोर ठेवण्याचं काम झालं पाहिजे. कारण, हे इतिहासात नोंद होणार आहे. त्यातून, भविष्यात वाद होऊ नये, अशी भावना अजित पवार यांनी
विधानभवनात लावण्यासाठी काढलेल्या तैलचित्रावर बाळासाहेबांचा उल्लेख हा हिंदुह्रदयसम्राट असा आहे. पण, ते नाव शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव केलं पाहिजे, त्याचा विचार करावा, अशी सूचना अजित पवारांनी यावेळी केली. बाळासाहेबांना सर्वधर्मीयांबद्दल आदर होता. सर्वच धर्माच्या लोकांसाठी त्यांनी काम केलंय. बाळासाहेब हे हिंदुह्रदयसम्राट होते, हे अर्धसत्य आहे, त्यांना सर्वच धर्मांचा आदर होता. अशा शब्दात अजित पवारांनी बाळासाहेबांचं वर्णन केलं. बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानीधार्जिण्या मुसलमांनांच्या विरोधात होते, ते मुस्लीमविरोधी नव्हते, असेही अजित पवारांनी सांगितलं. तसेच, बाळासाहेबांनी दलित पँथर, भीमशक्ती-शिवशक्ती यांसह मुस्लीम लीगलाही कधीकाळी पाठिंबा दिला होता, अशा राजकीय युतीच्या आठवणीही अजित पवारांनी सांगितल्या. तसेच, बाळासाहेब ठाकरे हे हिंदुह्रदयसम्राट तर होतेच, पण ते नेतृत्त्वसम्राट होते, कलासम्राट होते, वक्तृत्वसम्राट होते, चक्रवर्ती सम्राट होते, अशा उपाधीही अजित पवारांनी भाषणातून दिल्या.
मध्यवर्ती कार्यालय, विधानभवन येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यातून लाईव्ह https://t.co/e3ExQuz5C8
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 23, 2023
शिवसेना नेत्यांकडून राज ठाकरेंचं स्वागत
दरम्यान, या मनसे प्रमुख राज ठाकरे हे विधान भवनात दाखल झाले. तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री त्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळाच्या गेटवर आले होते. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणावेळी ठाकरे कुटुंबातील कोण उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात राज ठाकरे, निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.