बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 02:37 AM2019-10-26T02:37:40+5:302019-10-26T06:17:17+5:30
गणपतराव देशमुख निवृत्त; मात्र अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम कायम
- संदीप आडनाईक
मुंबई : आठव्यांदा राज्याच्या विधानसभेत प्रवेश करण्याचा मान आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे जातो. २0१९ च्या निवडणुकीत विजय मिळवून थोरात हे संगमनेर मतदारसंघातून आठवेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. अर्थात अकरा वेळा आमदार राहण्याचा विक्रम अजूनतरी शेकापचे गणपतराव देशमुख यांचाच आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे आतापर्यंतचे विक्रमी काळ एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार म्हणून ओळखले जातात. मात्र २0१९ च्या विधानसभा निवडणुकीत न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने आता हा मान थोरात यांच्याकडे जातो.
शेतकरी, कामगार आणि वंचितांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणारे गणपतराव देशमुख यांनी सांगोला या विधानसभेच्या मतदारसंघाचे अकरा वेळा प्रतिनिधीत्व केले. राज्याच्या स्थापनेपासूनच्या राजकीय प्रवासाचे ते साक्षीदार आहेत. शिवाय २0१४ च्या विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. ते ९३ वर्षांचे आहेत.
गणपतराव यांनी एकूण १३ विधानसभेच्या निवडणुका लढविल्या आणि ११ वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. २0१९ ची निवडणुक न लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांचा वारसा पुढे कोण चालवणार याची मोठी चर्चा झाली, परंतु त्यांचे नातू अॅड. अनिकेत देशमुख यांनी ही निवडणूक लढविली, परंतु त्यांना निसटत्या मतांनी पराभव पत्करावा लागला.
बाळासाहेब थोरात यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातव्यांदा विधानसभेत प्रवेश करत आहेत. त्यांच्यापाठोपाठ विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे हेही सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश केला आहे.
हरिभाऊ बागडे यांनी सहा वेळा फुलंब्री (जि. औरंगाबाद) मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहिलेले दिलीप वळसे-पाटील हेही सहा वेळा आमदार राहिलेले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सहकारी असलेल्या वळसे पाटील यांनी १९९० पासून राजकारणात प्रवेश केला. वळसे पाटील हे २००९ ते २०१४ या कालखंडात विधानसभेचे अध्यक्ष होते.