“PM मोदींनी ५० वेळा गजर करुन एका अर्थाने काँग्रेसचा प्रचारच केला”: बाळासाहेब थोरातांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 08:22 PM2022-02-08T20:22:50+5:302022-02-08T20:24:00+5:30

लता दीदींना मिळालेल्या अनेकविध पुरस्कारांवेळी काँग्रेसचेच सरकार सत्तेत होते, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

balasaheb thorat replied pm narendra modi criticism over congress in rajya sabha | “PM मोदींनी ५० वेळा गजर करुन एका अर्थाने काँग्रेसचा प्रचारच केला”: बाळासाहेब थोरातांचा टोला

“PM मोदींनी ५० वेळा गजर करुन एका अर्थाने काँग्रेसचा प्रचारच केला”: बाळासाहेब थोरातांचा टोला

Next

मुंबई: सोमवारी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर घणाघाती टीकास्त्र सोडले. मात्र, यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधानांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदींनी ५० वेळा गजर करुन एका अर्थाने काँग्रेसचा प्रचारच केला, असा टोला लगावला. 

संसद हे कायदेमंडळ आहे, तो राजकीय सभेचा आखाडा नाही. बहुदा पंतप्रधान हे विसरले असावेत. पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधानांनी मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या ६० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी किमान ५० वेळा काँग्रेसचा गजर करून एका अर्थाने काँग्रेसचा प्रचारच केला. खोटा इतिहास सांगून मते मिळविण्याचा पंतप्रधानांचा हा केविलवाणा प्रयत्न होता, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. 

काँग्रेस निरपेक्ष भावनेने काम करते

खरे तर काँग्रेस निरपेक्ष भावनेने काम करते. देशाच्या उभारणीत काँग्रेसचे योगदान वादातीत आहे. काँग्रेसने अशा गोष्टींचा वापर राजकारणासाठी कधीच केला नाही. गेली पन्नास वर्ष देशाचे राजकारण जवळून बघतो आहे, त्यात प्रत्यक्ष सहभागी आहे. पंतप्रधानपदावर विराजमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने नेहमी संसद भवन आणि लाल किल्ल्यावरून राजकीय सभेतील भाषण करू नये अशी अपेक्षा आहे, हे देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी आवश्यक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे, असे थोरात यांनी नमूद केले. 

लता दीदींचे नाव घेऊन केलेले राजकारण वेदनादायक

लता दीदींनी आपल्या दैवी सुरांनी अखिल मानवजातीला आनंद दिला. लता दीदींच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांच्या नावाचा वापर पंतप्रधानांनी राजकारणासाठी सुरू केला हे वेदनादायक आहे. काँग्रेसने कायमच लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांचा सन्मान केला आहे. पंडितजी, इंदिरा गांधी आणि अगदी सोनिया गांधी याही लतादीदींच्या कलेच्या चाहत्या आहेत. मंगेशकर कुटुंबीयांनी केलेली कलेची उपासना वादातीत आहे. तुमच्या आमच्या राजकारणाच्या पलीकडची आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासमोर लतादीदींनी गायलेले ए मेरे वतन के लोगो हे गीत अजरामर झाले. पद्मभूषण, उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार, राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरचा जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार असे अनेक सन्मान देऊन जेव्हा देशाने लतादीदींचा गौरव केला तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सरकारे होती. काँग्रेसने कधीच या पुरस्कारांचा राजकीय वापर केला नाही, कारण तो कलेचा सन्मान होता, असेही थोरात म्हणाले. 
 

Web Title: balasaheb thorat replied pm narendra modi criticism over congress in rajya sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.