धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे, शक्ती कायद्यासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान
By महेश गलांडे | Published: January 22, 2021 01:21 PM2021-01-22T13:21:52+5:302021-01-22T13:24:08+5:30
धनंजयसंदर्भातील बातमी सकाळीच माझ्या कानावर आली, त्यावरुन शक्ती कायद्याबाबात बारकाईने विचार करण्याची गरज वाटते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हटले.
मुंबई - गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.
धनंजयसंदर्भातील बातमी सकाळीच माझ्या कानावार आली, त्यावरुन नवीन येणाऱ्या 'शक्ती' कायद्याबाबात बारकाईने विचार करण्याची गरज वाटते, आता जॉईंट सिलेक्ट कमिटीकडं ते आम्ही दिलंय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हटले. जेव्हा धनंजय मुंडेंवर आरोप झाले, तेव्हा सगळीकडे ब्रेकिंग न्यूज सुरू होती. एखादा व्यक्ती राजकारणात काम करत असताना, त्याचं नाव चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. पण, एखाद्या गंभीर आरोपाने मोठी बदनामी होते, एका झटक्यात लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. विरोधकही आक्रमक होतात, महिला संघटना आंदोलन करतात. आता, ज्यांनी मागण्या केल्या, काही आक्रमक विधानं केली त्याला जबाबदार कोण?. महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे, राजकारणात उंची प्राप्त करायला मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे, आरोप करणाऱ्यांनी आणि आरोपानंतर प्रतिक्रिया देणाऱ्यांनी विचार करायला हवा, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडेंना मिळालेल्या संधीचं नेहमीच त्यांनी सोनं केलं. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही चांगलं काम केलं. तर, विधानसभेत पंकजा मुडेंसारख्या कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. आजही आघाडीच्या सरकारमध्ये ते महत्त्वाच्या पदावर काम करत आहेत. बहुजन समाजाच्या नेतृत्वाला शरद पवार यांनी संधी दिली. पण, अशा आरोपांमुळे हे नेते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अडचणीत येतं. घरातील सर्वचजण वेगळ्याच तणावात जातात. आज, ती केस मागे घेतली, पण 7 ते 8 दिवस सर्वांनाच त्रास झाला. राष्ट्रवादी पक्षाला, पवारसाहेबांना, जयंत पाटलांना, अजित पवारांनाही प्रश्न विचारले गेले. यापूर्वीही राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावरही आरोप झाले, त्यांची आणि पक्षाचीही बदनामी झाली. पण, त्याही मुलीने तक्रार मागे घेतल्यानंतर कुठे बातमीही दिसत नाही, असे पवार यांनी म्हटले. तसेच, धनंजय मुंडेंसोबत अद्याप बोलणं झालं नाही, लवकरच त्यांच्याशी बोलेन, असेही पवार यांनी सांगितलं.
शरद पवार म्हणाले
धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर म्हणाले की, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र, या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं. तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षाने नोंद घेतली आहे. मी स्वत: त्यांच्याशी बोललो होतो. मात्र, या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल,' अशी भूमिका घेत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली होती.
तक्रार मागे
धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वेळापासून तिची बहिण (करुणा शर्मा) आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.
तक्रारदार महिलेने काय केले होते आरोप?
'२००६ पासून चार-एक वर्ष सोडल्यास धनंजय मुंडेंनी माझा वापर केला. २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मला सांत्वना दाखवून, विश्वास देऊन केवळ माझा वापर करून घेतला. मला उद्ध्वस्त केलं. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला, असे खळबळजनक आरोप तक्रारदार महिलेनं केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प का राहिलात, असा प्रश्न महिलेला विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप महिलेने केला होता.
माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे- धनंजय मुंडे
माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे म्हटलं होतं. धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे म्हटलं होतं. फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केलं होतं.