बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:26 PM2020-08-09T14:26:14+5:302020-08-09T14:31:32+5:30
भाजपाने या प्रकरणात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करत शिवसेना मंत्र्यांना उत्तर दिलं आहे.
मुंबई – बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा रातोरात हटवल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मनगुत्ती गावातील चौकात मराठी बांधवांनी हा पुतळा बसवला होता, या पुतळ्यावरुन गावातील दोन गटात वाद झाला, यामध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र पुतळा हटवणार नसल्याची ठाम भूमिका मराठी लोकांनी घेतली होती.
शुक्रवारी मध्यरात्री गावातील लाईट गेल्यानंतर छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला, त्याठिकाणी पुतळ्याऐवजी फक्त काळा प्लास्टिक टाकण्यात आलं होतं, ही घटना समजताच संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला. हा पुतळा हटवल्यामुळे भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं. आता भाजपाने या प्रकरणात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करत शिवसेना मंत्र्यांना उत्तर दिलं आहे.
याबाबत निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कर्नाटकातछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोली यांनी हटवला आहे आणि याच काँग्रेसच्या मांडीला लावून शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे हिंमत असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या असा टोला त्यांनी लगावला आहे. याबाबत निलेश राणेंनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले आहे.
काय म्हणाले होते उदय सामंत?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं केंद्रात सत्तेत यायचं. त्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने मराठी माणसाने स्थापन केलेला शिवछत्रपतींचा पुतळा काढून टाकायचा. आता जनतेने ठरवावं काय योग्य आणि काय अयोग्य आहे अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी भाजपावर टीका केली होती, त्या टीकेला भाजपा नेते निलेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.
कोण आहेत सतीश जारकीहोली?
सती जारकीहोली हे काँग्रेसचे आमदार असून कुमारस्वामी सरकारमध्ये ते मंत्री होते. अलीकडेच कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक केली आहे.
दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मनगुत्ती ग्रामपंचायतीने पूर्व परवानगीने हा पुतळा बसविण्यात येऊन सुद्धा स्थानिक प्रशासनाने जाणीवपुर्वक आणि सुडबुद्धीने तो रातोरात हटवला. याचा मी निषेध करतो. कर्नाटक सरकारने संबंधितांवर कारवाई करुन आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.