डीजे बंदीमुळे विसर्जन सोहळ्यातील मिरवणुकीत बेंजोचे दर वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 06:14 AM2018-09-23T06:14:37+5:302018-09-23T06:14:59+5:30
डीजेवर पोलिसांनी लादलेली बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर मुंबईतील बहुतेक बेंजो वादकांकडून आकारण्यात येणाऱ्या रकमेत झपाट्याने वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : डीजेवर पोलिसांनी लादलेली बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर मुंबईतील बहुतेक बेंजो वादकांकडून आकारण्यात येणाऱ्या रकमेत झपाट्याने वाढ करण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यात प्रसिद्ध असलेला लालबाग बिट्स बेंजो पथक गणेश विसर्जनदिवशी बुकिंग घेत नसल्याची माहिती वादक कृणाल लाटे यांनी दिली. लाटे म्हणाले की, बिट्समधील सर्व वादक विसर्जन दिनी लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दंग असतात. याशिवाय बिट्स आधीपासून वाजवण्यासाठी प्रत्येक तासाला २० ते २५ हजारांहून अधिक रक्कम आकारत आहेत.
वरळी बिट्सचे संस्थापक समीर पेडणेकर म्हणाले की, विसर्जनदिनी कोल्हापूरची आॅर्डर घेतलेली आहे. मुंबईतील आॅर्डरसाठी तासाला २५ हजार रुपये, तर मुंबईबाहेरील आॅर्डरसाठी तासाला ३० हजार रुपये आकारतो. विसर्जनाच्या आॅर्डर आधीपासून बुक होत्या. त्यामुळे रक्कम वाढवण्याचा प्रश्नच येत नाही. दरम्यान, नामांकित मंडळांच्या आॅर्डर बुक असल्याने बहुतेक मंडळांनी डीजेच वाजवण्याची भूमिका घेतली असून उत्सवातील उत्साह कायम आहे.
दक्षिण मुंबईतील एका जुन्या मंडळाने सांगितले की, ऐनवेळी डीजे रद्द करून बेंजो ठेवणे शक्य नाही. जुने आणि नामांकित मंडळ असल्याने वाजत-गाजत गणपती नेण्याची परंपरा आहे. त्यामुळे यंदा डीजेशिवाय पर्याय नाही.
पोलीस रोखत नाहीत, तोपर्यंत डीजेच वाजवण्यात येईल. त्यानंतर परिस्थितीनुसार निर्णय घेणार असल्याचे एका मंडळाच्या सचिवाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
ढोलांच्या संख्येनुसार दरात वाढ
एरव्ही ८ ते १० हजार रुपये तासाला आकारणाºया बेंजो पथकांकडून आता मंडळांकडून १५ ते २० हजार रुपये तासाला, तर एरव्ही १५ ते २० हजार रुपये आकारणाºया पथकांकडून २५ ते ३० हजार रुपयांची मागणी केली जात आहे.
तासाला किमान १६ हजार रुपये आकारत असून ढोलांच्या संख्येनुसार पैसे वाढतात. त्यामुळे तासाला ३० ते ३५ हजार रुपयेही आकारल्याचे साई धाम ढोल पथकाचे अध्यक्ष संदेश गुरव यांनी सांगितले. संस्कृती जपण्यासाठी पथक तयार केल्याने तूर्तास कोणतीही दरवाढ केली नसल्याचे संदेश यांचे म्हणणे होते.