Bharat Bandh : आंदोलनापूर्वीच काँग्रेस नेते संजय निरुपम पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 08:44 AM2018-09-10T08:44:35+5:302018-09-10T10:44:45+5:30
Bharat Bandh : आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई - देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे. दरम्यान आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना ताब्यात घेतले आहे. संजय निरुपम यांना त्यांच्या निवासस्थानाहून पोलिसांनी ताब्यात घेतले. संजय निरुपम यांच्यासहीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
Huge police bandobast at my residence. Workers are being picked up since early morning #BharatBandh
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 10, 2018
Dear Mumbai Police No use of ur bandobast at my residence anymore . Got out of house despite ur tamasha. Stop checking my building's cctv unit.#BharatBandh
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 10, 2018
(Bharat Bandh Live Updates: 'भारत बंद'ला सुरुवात; देशभरात काँग्रेसची निदर्शनं)
मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडणार
या बंदच्या माध्यमातून, आधी चार राज्यांत विधानसभेच्या व नंतर लोकसभेची निवडणूक होणार असताना, मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. ''देशात इंधनाचे भाव दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे, अशा वेळी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. सोमवारचा ‘भारत बंद’ त्यासाठीच आहे. देशभरातील व्यापारी वर्गाने त्याला उत्स्फूर्तपणे साथ द्यावी, असे आवाहन करीत माकन म्हणाले, बंदच्या काळात कोणत्याही प्रकारची हिंसक घटना होणार नाही, बंद शांततेत पार पडेल, याची आम्ही दक्षता घेतली आहे'', असे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.
‘बंद’ची कारणमीमांसा देताना माकन म्हणाले, चार वर्षांत पेट्रोलवर २११.७ टक्के व डिझेलवर ४४३ टक्के एक्साईज ड्युटी वाढली आहे. मे २0१४ मधे पेट्रोलवर ९.२ रूपये व डिझेलवर ३.४६ रूपये एक्साईज कर होता आता तो अनुक्रमे १९.४८ रूपये व १५.३३ रूपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. सरकारने गेल्या चार वर्षात इंधनावरील एक्साईज ड्युटीव्दारे ११ लाख कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे इंधन भडक्याने वाढत चाललेली तमाम वस्तूंची महागाई रोखण्यासाठी पेट्रोल व डिझेलला त्वरित ‘जीएसटी’च्या कक्षेत आणावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.
(Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे)
जनतेला हवे आहे उत्तर
डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या सुरू असलेल्या घसरणीचा उल्लेख करीत माकन म्हणाले, युपीएच्या काळात डॉलरच्या तुलनेत रूपया ६0 वर पोहोचला तेव्हा नरेंद्र मोदी म्हणायचे की, रूपया अति दक्षता विभागात दाखल झाला आहे आता रूपयाने ७२ ची सीमा पार केली तेव्हा पंतप्रधान मोदींना काय म्हणायचे आहे? डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत करण्यासाठी सरकारने काय केले, त्याचे उत्तरही जनतेला हवे आहे.
'बंद यशस्वी करा'
राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते राज्यातील विविध आंदोलनात सहभागी होतील. शांततामय मार्गाने बंद यशस्वी करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.