Bharat Bandh : राज ठाकरेंचे शिलेदार ताब्यात, किल्लेदार-देशपांडेंसह काँग्रेस कार्यकर्तेही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 04:56 PM2018-09-10T16:56:54+5:302018-09-10T16:57:49+5:30
मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, पदाधिकारी यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे, स्नेहल जाधव, रिटा गुप्ता यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना देखील सेनाभवन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुंबई - भारत बंददरम्यान दादर परिसरात जवळपास सर्वच दुकानं बंद असून बंदाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. आज सकाळी दादर परिसरातील शाळा आणि महाविद्यालयं सुरळीत सुरु होती. सकाळी १० नंतर दादर पश्चिमेकडील नेहमी वर्दळीचा असलेल्या परिसरात म्हणजेच सेना भवनाच्या आजूबाजूच्या परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेदरम्यान या बंदाला हिंसक रूप लागू नये म्हणून शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, पदाधिकारी यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे, स्नेहल जाधव, रिटा गुप्ता यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना देखील सेनाभवन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
दुपारभर त्यांना दादर परिसरात हिंसेचे गालबोट लागू नये म्हणून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात मनसैनिक आणि काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना डांबून ठेवण्यात आले होते. तसेच दादर परिसरातील स्टेशन रोड, मार्केट आणि सेना भवन येथे आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातला. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच काही मनसे आणि काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि सायंकाळी सोडून दिले.