भारत जोडो, निर्भय बनो अभियान आता मुंबईत; हायटेक प्रचार बाजूला सारत समांतर अभियानावर भर
By रेश्मा शिवडेकर | Published: May 14, 2024 08:21 AM2024-05-14T08:21:19+5:302024-05-14T08:22:28+5:30
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत सात जाहीर सभा घेऊन संविधान बचावाचा नारा दिला जाणार आहे.
रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घटनात्मक मूल्यांची जपवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीच्या हायटेक प्रचाराविरोधात फारसा गाजावाजा न करता राज्यभर सुरू असलेले निर्भय बनो, भारत जोडो अभियान आता मुंबई लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. कोल्हापूर, चंद्रपूर आदी ठिकाणी ‘निर्भय बनो’च्या सभांना चांगला प्रतिसाद लाभला. आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत सात जाहीर सभा घेऊन संविधान बचावाचा नारा दिला जाणार आहे.
ध्वनिक्षेपकांचा वापर न करता लहान बैठका, चर्चांचे आयोजन करत लहान-मोठे व्यावसायिक, नोकरदार, तरूणांशी संवाद साधण्याकडे या अभियानाचा भर असतो. त्यात कुठल्याही पक्षाचा झेंडा, चिन्ह, शेले, टोप्या आदी प्रचार साहित्याला स्थान नसते. बैठकांच्या आयोजनाबरोबरच बुद्धविहार, आदिवासी पाड्यांना भेटी, हमाल, लहान-मोठ्या कारागीरांच्या गटांशी चर्चांच्या माध्यमातून कोणताही गाजावाजा न करता अभियानाचे काम चालते. या अभियानाला काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एकत्रित साथ लाभते आहे, हे विशेष.
काही ठिकाणी विचारवंतांच्या बैठका आयोजित करून हा संवाद घडवून आणला जात आहे. संविधान बचाव, लोकशाहीचे बळकटीकरण आदी मुद्दे या बैठकांच्या केंद्रस्थानी असतात, असे उत्तर मुंबईतील काँग्रेसचे कार्यकर्ते मिलिंद शिर्के यांनी सांगितले. या उपक्रमाचा भाग म्हणून दहिसर ते मालाडदरम्यानच्या २६ ते २७ बुद्धविहारांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील आदिवासी पाड्यांनाही भेटी देऊन तिथल्या आदिवाशींशी संवाद साधला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आम्ही कुणा एका पक्षाची बाजू मांडत नाही. मात्र, लोकशाही, संविधान बचाव हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. या अभियानांअंतर्गत एकट्या उत्तर मुंबईत २५ हून अधिक बैठका घेण्यात आल्या आहेत. -प्रमोद शिंदे, कार्यकर्ते, निर्भय बनो
भारतीय संविधानिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी मतदारांना सजग आणि निर्भयपणे मतदान करावे, यासाठी निर्भय बनो अभियान राबविण्यात येत आहे. हा एक सामाजिक संघटनांचा मंच आहे. भारतीय संविधानाचा आदर करत आम्ही सामाजिक उपक्रम राबवत आहोत. -सीताराम शेलार, मुंबई सहसमन्वयक, भारत जोडो अभियान