भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईत; ‘इंडिया’ आघाडी करणार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:48 AM2024-02-09T09:48:19+5:302024-02-09T09:50:23+5:30
भारत जोडो यात्रेच्या समारोपावेळी सर्व घटक पक्ष आमंत्रित
आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला मुंबईत विरोधी आघाडी ‘इंडिया’ची जाहीर सभा होणार आहे. तोपर्यंत सर्व घटकपक्षांचे जागावाटप होईल, अशी काँग्रेसला आशा आहे. ही सभा विरोधी एकजुटीचे शक्तिप्रदर्शन असेल.
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची युती (महाविकास आघाडी) आहे. महाविकास आघाडीकडूनच काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यात्रेच्या समारोपाला काँग्रेस सर्व घटकपक्ष व महाराष्ट्रातील सहकाऱ्यांना आमंत्रित करून काँग्रेस शक्तिप्रदर्शन करू इच्छिते. इंडिया आघाडीच्यामुंबईत झालेल्या बैठकीत पहिली सभा भोपाळमध्ये आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सभा झाली नव्हती.
‘द्वेष पसरवणे हाच भाजपचा कार्यक्रम’
‘सत्ताधारी पक्षाचा दोन कलमी कार्यक्रम म्हणजे अन्यायाला प्रोत्साहन देणे आणि द्वेष, हिंसाचार पसरवणे आहे,’ अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी भाजपवर केली. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते. आता जनतेला न्याय मिळावा, यासाठी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १९ फेब्रुवारी रोजी अमेठी लोकसभा मतदारसंघात पोहोचेल, ज्याचे त्यांनी लोकसभेत तीन वेळेस प्रतिनिधित्व केले होते.