भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 06:56 PM2020-07-16T18:56:11+5:302020-07-16T18:57:44+5:30
राव यांनी तळोजा कारागृहातून शनिवारी कुटुंबीयांना फोन केला होता, त्यावेळी स्वत: ही माहिती दिली.
मुंबई - : एल्गार परिषद व कोरेगाव-भीमा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित आरोपी कवी वरवरा राव यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. वरवरा राव यांचा विशेष एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वरवरा राव (८१) यांनी जामिनावर सुटकेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, २६ जून रोजी विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला.
राव यांनी तळोजा कारागृहातून शनिवारी कुटुंबीयांना फोन केला होता, त्यावेळी स्वत: ही माहिती दिली. त्यामुळे राव यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे. तत्पूर्वीच आज त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जे.जे. रुग्णालयाने सांगितल्याप्रमाणे तळोजा कारागृह राव यांची वैद्यकीय चाचणी करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
राव यांचा वैद्यकीय अहवाल आणि त्यानुसार कारागृह प्रशासनाने केलेले उपचार याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश तळोजा कारागृहाला द्यावेत. तसेच राव यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करावी आणि आवश्यकता भासल्यास त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, राव मागील दोन महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर तळोजा कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यांना लवकर चांगल्या रुग्णालयात भरती करावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांनी राज्यासह केंद्र सरकारकडे केली होती. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जे. जे.त दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जे. जे.चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली. त्यांना चक्कर येत असून त्यांच्या तपासण्या सुरू आहेत.