अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!

By यदू जोशी | Published: October 8, 2024 05:23 AM2024-10-08T05:23:41+5:302024-10-08T05:26:22+5:30

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. अजित पवारांची साथ सोडलेल्यांनी भाजपला फटका दिला.

big blow to ajit pawar gets leaders leaning towards sharad pawar after the lok sabha and now the vidhan sabha too | अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!

अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एकामागून एक धक्का देण्याचे काम ज्येष्ठ नेते शरद पवार करत असून विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीपासूनच या धक्कातंत्राची सुरुवात झाली होती. बीडचे नेते बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांची साथ सोडली आणि शरद पवारांचे बोट धरून ते लोकसभेला लढले व जिंकलेदेखील. अहमदनगर जिल्ह्यातील आमदार नीलेश लंके शरद पवार गटात गेले व खासदार झाले. सोनवणे व लंके यांनी पंकजा मुंडे व सुजय विखे-पाटील यांना पराभूत केले. याचा अर्थ अजित पवारांची साथ सोडलेल्यांनी भाजपला फटका दिला. 

आता विधानसभेतही अजित पवार गटाला गळती सुरू होण्याची चिन्हे आहेत. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी स्वत: न लढता मुलगा रणजितसिंह यांना लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुलासाठी त्यांनी शरद पवार यांना उमेदवारी मागितली आहे. अपक्ष लढण्याचेही संकेत दिले. त्यांचे बंधू व करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे २०१९ मध्ये अपक्ष जिंकले होते; सध्या ते अजित पवारांसोबत आहेत, पण सोमवारी तीन शिंदे बंधूंनी मेळावा घेतला आणि अपक्ष लढण्याचे स्पष्ट संकेत दिले. हा अजित पवारांना शह मानला जात आहे. 

राज्यात अजित पवार गटाचे कोणते नेते आहेत शरद पवार गटाच्या वाटेवर?

- विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार गटात असले तरी ते लवकरच शरद पवारांसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

- जुन्नरचे (जि. पुणे) अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्याने तेही अजित पवारांची साथ सोडणार, अशी चर्चा आहे.

- इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर हे अजित पवार गटाकडून लढणार असे संकेत असतानाच खोसकर यांनी शरद पवार यांची भेट घेत काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

- बुलडाणाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटात असले तरी त्यांच्याकडूनच लढणार की तुतारी हाती घेणार हे अद्याप निश्चित नाही. 

- विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ यांनी शरद पवार गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित गव्हाणे, १५ माजी नगरसेवक व ६ प्रमुख पदाधिकारी आधीच शरद पवार गटात गेले आहेत. 
 

Web Title: big blow to ajit pawar gets leaders leaning towards sharad pawar after the lok sabha and now the vidhan sabha too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.