सांगली, भिवंडीबाबत मोठा निर्णय: मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, वाचा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:09 PM2024-04-09T12:09:17+5:302024-04-09T12:11:40+5:30
Lok Sabha Election: संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा २१-१७-१० असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगितलं. तसंच कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याबाबतची माहिती दिली.
Mahavikas Aghadi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीत सुरू असलेली जागावाटपाची चर्चा संपली असून आज मविआ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत कोणता पक्ष किती जागा लढणार, तसेच निवडणुकीला महाविकास आघाडी कोणत्या मुद्द्यांसह सामोरे जाणार याबाबतची माहिती दिली आहे. नरिमन पॉइंट येथील शिवालय इथं झालेल्या मविआच्या या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य पातळीवर आणि इंडिया आघाडीमध्ये राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकप, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे समाविष्ट झाल्याचं सांगितलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा २१-१७-१० असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती दिली. तसंच कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याबाबतची माहिती दिली.
महाविकास आघाडीचं असं असेल जागावाटप:
नंदुरबार, धुळे, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई, मुंबई उत्तर पूर्व अशा एकूण १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढणार असून यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, माढा, अहमदनगर दक्षिण, रावेर, भिवंडी, बीड, वर्धा, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे २१ जागा लढणार असून यामध्ये जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या मतदारसंघांचा समावेश आहे.