Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 10:27 PM2024-10-12T22:27:40+5:302024-10-12T22:30:18+5:30
गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे डॉक्टरांनी सिद्दिकी यांना मृत घोषित केले.
Baba Siddique Firing ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तीन तरुणांकडून हा गोळीबार करण्यात आला असून बाबा सिद्दिकी यांना एक गोळी लागली होती. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून बाबा सिद्दिकी यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी हे त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील कार्यालयाजवळ थांबले होते. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
#UPDATE | Senior NCP leader Baba Siddique passes away: Lilavati Hospital https://t.co/P0VWePWldd
— ANI (@ANI) October 12, 2024
दरम्यान, राज्याचं मंत्रिपद भूषवलेल्या बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राज्यभर खळबळ उडाली असून कायदा-सुव्यस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
सिद्दिकी यांची राजकीय कारकीर्द
बाबा सिद्दिकी हे दीर्घकाळ काँग्रेस पक्षात होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांची राज्य मंत्रिमंडळातही वर्णी लागली होती. सिद्दिकी यांनी यंदा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सिद्दिकी यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता.