मोठी बातमी: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'या' १५ जागांचा आढावा; भाजप किती जागा सोडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 05:04 PM2024-03-06T17:04:57+5:302024-03-06T17:08:14+5:30
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची राजधानी मुंबईत काल आणि आज अशी दोन दिवसीय आढावा बैठक पार पडली.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीसह महाविकास आघाडीतही जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी खलबतं सुरू आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांच्याकडून महायुतीच्या जागावाटपात आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची राजधानी मुंबईत काल आणि आज अशी दोन दिवसीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी राज्यातील एकूण १५ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला असून यातील किमान ९ जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचे समजते.
राष्ट्रवादीच्या बैठकीत काल नाशिक, दिंडोरी, हिंगोली, ईशान्य मुंबई, धाराशीव, रायगड या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर आज बैठकीच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर (दक्षिण), गडचिरोली या लोकसभा मतदारसंघाच्या सद्यस्थितीचा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या किती जागा निवडून येऊ शकतील याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादीने मागील लोकसभा निवडणुकीत सातारा, बारामती, शिरूर आणि रायगड या चार जागांवर विजय मिळवला होता. पक्षात काही महिन्यांपूर्वी फूट पडून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गट महायुतीत आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट महाविकास आघाडीसोबत आहे. अशा स्थितीत जागावाटपात जास्त जागा मिळवताना या दोन्ही गटांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १५ जागांचा आढावा घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांना भाजपकडून किती जागा सोडल्या जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक आज पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध मतदारसंघांचा लोकसभानिहाय आढावा आज घेण्यात… pic.twitter.com/NBooXvlFgd
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 6, 2024
छगन भुजबळांनी काय मागणी केली?
जागावाटप निश्चित होण्याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जितक्या जागा मिळतील, तितक्याच जागा आम्हाला मिळाव्यात, अशी भूमिका मांडली आहे. "महायुतीमध्ये आम्हाला दिलेलं आश्वासन पाळले जाईल, असा विश्वास आहे. त्यामुळे, शिंदेंच्या शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात. महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. जागावाटपाबाबत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं आहे, लवकरच जागावाटप होईल. त्यानंतर, उमेदवारांची घोषणा होईल," असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.