अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 06:03 PM2024-06-07T18:03:58+5:302024-06-07T18:04:41+5:30
Praful Patel : इक्बाल मिर्ची प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Praful Patel Case : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी प्रफुल पटेल यांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर आठ महिन्यांनंतर, केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने एअर इंडिया-इंडियन एअरलाइन्स विलीनीकरण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानंतर अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा दिला.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा देताना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ईडीने मोठा दिलासा दिला. इक्बाल मिर्ची प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये वरळीतील सीजे हाऊसमधील संपत्तीचा समावेश होता. प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्चीकडून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आता याच प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना दिलासा मिळाला.
आता ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत वरळीतील सीजे हाऊसमधील प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीच्या १२व्या आणि १५व्या मजल्यावरील फ्लॅटवरील जप्ती उठली. जप्त केलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत १८० कोटी रुपये आहे. ईडीने २०२२ मध्ये ही मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पीएमएलए प्रकरणाबाबत या जप्तीच्या कारवाईविरोधात सेफेमा न्यायाधिकरणात अपील केले होते. अखेर प्रफुल्ल पटेल यांना दिलासा मिळाला आणि १८० कोटींची संपत्ती परत मिळाली.
जप्ती कशी उठली?
न्यायाधिकरणाने पटेलांविरुद्ध ईडीची कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत या मालमत्ता मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या नाहीत किंवा इक्बाल मिर्चीशी संबंधित नसल्याचे म्हटलं आहे. न्यायाधिकरणाने म्हटले की सीजे हाऊसमधील हाजरा मेमन आणि तिच्या दोन मुलांची मालमत्ता या प्रकरणात स्वतंत्रपणे जोडण्यात आली होती आणि पटेलांच्या मालकीची संपत्ती जोडण्याचे कारण नव्हतं. कारण ती गुन्ह्यातील रकमेचा भाग नाही.
नेमकं प्रकरण काय?
ईडीने फरारी आर्थिक गुन्हेगार असिफ आणि जुनैदची आई हाजरा मेमन यांच्याकडून ही मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप केला होता. २०२२ मध्ये, ईडीने प्रफुल्ल पटेल, त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट जप्त केले. त्यांच्यावर गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होता. ईडीने ज्या मालमत्तेवर कारवाई केली त्या मालमत्तेचे दोन मजले इक्बाल मिर्ची यांच्या कुटुंबाचे असल्याचा आरोप आहे. ईडीने यापूर्वीच त्यांची मालमत्ता जप्त केली होती. इक्बाल मिर्चीसोबत करार करून ही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता.
ईडीच्या दाव्यानुसार हा करार २००७ मध्ये झाला होता. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. या प्रकरणात ईडी पीएमएलए कायद्यांतर्गत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत होती. या प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर २०१९ मध्ये प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करण्यात आली.