परिस्थितीनुसार भूमिका बदलता का? कोर्टानं फटकारल्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, "मी हे प्रकरण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 02:25 PM2024-08-08T14:25:20+5:302024-08-08T14:25:40+5:30
मंत्री संजय राठोड प्रकरणात मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानंतर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
BJP Chitra Wagh: मंत्री संजय राठोड प्रकरणात मुंबई हायकोर्टाने भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र आता चित्रा वाघ यांच्या वकिलाने ही याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. यावरुन हायकोर्टानं वाघ यांना परिस्थितीनुसार भूमिका बदलता का असं म्हणत फटकारलं. त्यानंतर चित्रा वाघ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
महाविकास आघाडी सत्तेत असताना चित्रा वाघ यांनी २०२१ मध्ये संजय राठोड यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तरुणीला आत्महत्या करण्यास संजय राठोड यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तपासासाठी एसआयटी नियुक्त करावी किंवा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र आता सरकारी वकील वेणेगावकर यांनी तपासाविषयी माहिती दिल्यानंतर चित्रा वाघ यांचे वकील परांजपे यांनी ही याचिका निकाली काढण्याची वा मागे घेण्याची कोर्टाकडे परवानगी मागितली. मात्र, याचिका मागे घेतली तरी नंतर न्यायालयात दाद मागण्याची मुभा द्यावी, अशीही विनंती वाघ यांच्या वकिलाने केली होती.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, कोर्टाने चित्रा वाघ यांना फटकारलं आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ‘आम्ही याचिका निकाली का काढावी? वाघ यांनी त्यांची मागणी काय आहे हे आधी स्पष्ट करावे. परिस्थिती बदलली की, तुमची भूमिका बदलते. जनहित याचिकांद्वारे खेळ खेळला जात आहे. वाघ यांच्यासारख्या राजकीय नेत्या न्यायालयालाही त्यात गुंतवतात. पण, आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही, असे कोर्टानं म्हटलं. न्यायमूर्तींनी फटकाऱ्यानंतर चित्रा वाघ यांचे वकील परांजपे यांनी आपल्याकडे याचिका मागे घेण्यासंबंधी सूचना नाहीत, त्यामुळे यावर युक्तिवाद करू, असे कोर्टाला सांगितले.
दुसरीकडे या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यानंतर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत.सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे तसेही कठीण आहे. पण एक बाब याठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की, मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत. न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही. न्यायालयात हे प्रकरण सद्या सुरू आहे आणि तेथे मेरिटवरच निर्णय होईल, हा माझा ठाम विश्वास आहे," असं स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी दिले.