Nana Patole : आंबेडकरी चळवळीला भाजपने बदनाम केले- नाना पटोले; नक्षलवादी ठरविल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 07:07 AM2021-10-29T07:07:15+5:302021-10-29T07:07:35+5:30
Nana Patole : प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात पटोले बोलत होते.
मुंबई : केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरील अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात पटोले बोलत होते. कार्यक्रमाला बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्वजित कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो; पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरू आहे.
काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये संधी मिळेत, हेच सिद्धार्थ यांना मिळालेल्या जबाबदारीने पुन्हा दाखवून दिले आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
सिद्धार्थ हत्तीअंबिरे म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि नाना पटोले यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून संघटन मजबूत करेन.