भाजपा सरकार प्रियंका गांधींना घाबरते, अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 09:13 PM2019-07-19T21:13:31+5:302019-07-19T21:17:44+5:30
काँग्रेसकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.
मुंबई - भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरत आहे, म्हणूनच प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादर पश्चिम येथे इंडियाबुल्ससमोर निदर्शने केली.
काँग्रेसकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आ. यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, राजेश शर्मा, रमेश शेट्टी, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, गजानन देसाई, सचिव शाह आलम शेख, तौफिक मुलाणी, दादासाहेब मुंडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृतीचा निषेध करून आ. थोरात म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे बुधवारी जमिनीच्या वादातून गोळीबार करून १० जणांची हत्या करण्यात आली आहे. या हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना भेटण्यासाठी सोनभद्र येथे जात असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक केली आहे. हिंसाचारात बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला जाणे गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल करून उत्तर प्रदेश पोलिसांनी नेत्यांना अटक करण्याऐवजी गुन्हेगारांना अटक करावी असे, थोरात यांनी म्हटले. उत्तर प्रदेशात गुन्हेगार खुलेआम हत्या करतायेत, दरोडे घालतायेत. समाजकंटक दंगली घडवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी उत्तर प्रदेश पोलीस, विरोधीपक्षांच्या नेत्यांना अटक का करत आहेत? उत्तर प्रदेशात सर्वसामान्यांच्या हक्कांची गळचेपी सुरू असून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.