Ajit Pawar I-T Raids: “तुम्ही पाप केले, तुम्ही घोटाळे केले तर कबुल करा”; IT छाप्यानंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 03:22 PM2021-10-07T15:22:27+5:302021-10-07T15:23:35+5:30
Ajit Pawar I-T Raids: अजित पवारांना आता साखर कडू वाटायला लागली आहे, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असून, जरंडेश्वरसह दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. यातच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली असून, तुम्ही पाप केले, तुम्ही घोटाळे केले तर कबुल करा, असे म्हटले आहे.
अजित पवार आणि माध्यमांमुळे हे आयकर विभागाची धाड सुरु असल्याचे मला कळले आहे. या धाडी कशा संदर्भात सुरु आहेत हे अजित पवारच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. तुम्ही पाप केले आहे, तुम्ही घोटाळे केले आहेत तर कबुल करा. अजित पवारच नव्हे तर देशातील कुठल्याही निर्दोष व्यक्तीला तपास यंत्रणांनी हैराण करु नये, अशीच आमची भूमिका असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
अजित पवारांना आता साखर कडू वाटायला लागलीय
अजित पवारांना आता साखर कडू वाटायला लागली आहे. जरंडेश्वर येथे गेलो होतो. अजित पवारही काही दिवसांपूर्वी तिथे जाऊन आले आहेत. मग जरंडेश्वरचा खरा मालक कोण हे अजित पवारांनी सांगावे, अशी माझी त्या २७ हजार शेतकऱ्यांतर्फे विनंती आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे घोटाळ्यांसंदर्भात बोलत नाहीत
गेल्या १८ महिन्यात महाराष्ट्रात लूटमार, माफियागिरी ठाकरे, पवारांनी सुरु केली आहे. अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे घोटाळ्यांसंदर्भात बोलत नाहीत. साखर कारखान्यांच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर मुख्य न्यायाधीशांसमोर जाऊन काय ते सांगावे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. भाजपच्या कोणत्या नेत्यावर धाडी टाकल्या हे केंद्र सरकारने सांगावे, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यावर किरीट सोमय्या यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.