म्हाळगी प्रबोधिनीवरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; सातवांच्या टीकेला शेलारांचे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 03:34 AM2020-02-03T03:34:02+5:302020-02-03T06:26:09+5:30
काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांच्या आक्षेपानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मध्येच थांबविण्यात आले.
मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांच्या आक्षेपानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मध्येच थांबविण्यात आले. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रझा अकादमीला जवळ करणाऱ्यांकडून म्हाळगी प्रबोधनीला विरोध होणे स्वाभाविक आहे. यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरशामध्ये किंवा बार, रेस्टॉरंटमध्ये भरवा, अशा शब्दात शेलार यांनी पलटवार केला आहे.
मुंबई विद्यापीठातील वीस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे सुरू होता. म्हाळगी प्रबोधनी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित संस्था असल्याने काँग्रेसचे नेते राजीव सातव आणि एनएसयूआयने या प्रशिक्षणावर आक्षेप घेतला. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रशिक्षण कार्यक्रम थांबविण्याची सूचना केली. राजकीय विरोधानंतर प्रशिक्षण कार्यक्रम अर्ध्यावरच थांबवण्यात आल्याने भाजप नेते शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे. ज्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला त्यामागे केवळ राजकीय द्वेष आणि वैचारिक अस्पृषता असल्याचे आरोप शेलारांनी केला आहे.
सातव यांनी दाखविलेल्या वैचारिक अस्पृश्यतेला राज्य सरकारने वैचारिक दिवाळखोरीचा पुरस्कार द्यावा. महाराष्ट्रात असे प्रकार यापूर्वी घडले नाहीत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील कार्यक्रमात अमित शहा यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन झाले. तेव्हा आम्ही कुणी प्रतिष्ठानवर आक्षेप घेतला नव्हता, अशी आठवणही शेलार यांनी करून दिली.
...तर बाकेही धुऊन घ्या!
वैचारिक अस्पृश्यतेसोबत जागेची अस्पृश्यताही मानत आहात. तर, आता विधानसभेत ज्या बाकांवर आपण सत्ताधारी म्हणून बसला आहात, त्याच जागेवर संघ विचारांचे आम्ही सगळे यापूर्वी बसलो होतो. त्यामुळे ती बाकेसुद्धा आता धुऊन, पुसून घ्या, असा टोलाही शेलारयांनी पत्रात हाणला आहे.