CM ममता बॅनर्जींविरोधात भाजप नेत्याची तक्रार, राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 08:24 AM2021-12-02T08:24:24+5:302021-12-02T08:25:06+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली.
मुंबई: मुंबई दौऱ्यावर गेलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(CM Mamata Banerjee) यांच्यावर भारताच्या राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, मुंबईतील एका भाजप नेत्याने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली आहे.
A leader of Mumbai BJP filed police complaint against West Bengal CM Mamata Banerjee for "showing utter disrespect to national anthem" by allegedly singing it while in sitting position & then "abruptly stopping after 4 or 5 verses", during her visit to the city on Wednesday pic.twitter.com/5KqbJ8lC55
— ANI (@ANI) December 2, 2021
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खाली बसून राष्ट्रगीत गायले. याशिवाय, राष्ट्रगीत गात असताना मध्येच काही वेळ अचानक थांबल्या. यामुळे आपल्या राष्ट्रगीताचा अपमान होतो, असे तक्रारीत म्हटले आहे.
यूपीए आता आहे कुठे?
मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांची भेट घेतली आणि काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्यावर भर दिला. यूपीए आता आहे कुठे? यूपीए आता नाही, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत बुधवारी दिले.
परदेशात राहून राजकारण अशक्य
यावेळी ममतांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवरही टीका केली. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला लगावला. तसेच, तुम्ही काँग्रेसच्या विरोधात का लढत आहात, असा प्रश्न उपस्थितांपैकी एकाने विचारला. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेस आणि डावे पक्ष आमच्याविरोधात बंगालमध्ये लढले. त्यामुळे आता आम्हीही काँग्रेसविरोधात कंबर कसली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपल्याला हा लढा द्यावाच लागेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल
यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांच्याकडे आपण यूपीएचे नेतृत्व देणार का, असा प्रश्न विचारला असता ममता बॅनर्जी यांनी, पर्यायाच्या नेतृत्वाबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्याच वेळी शरद पवार यांनी भाजपला मजबूत पर्याय देताना काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, अशी भूमिका मांडली.