अजित पवारांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली, भाजपा आमदाराचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 03:58 PM2020-09-08T15:58:12+5:302020-09-08T15:59:37+5:30
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले होते. भाजपा आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते
मुंबई - विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निलम गोऱ्हेंचं अभिनंदन केले. त्यावेळी बोलताना अजित पवारांनी मिश्कील टीपण्णी केली. “शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आल्या आणि आमचं सरकार आलं, म्हणून पुन्हा एकदा या पदावर निलमताईंनाच नियुक्त करण्यात आलं,” असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांच्या या टीपण्णीला तितक्याच मिश्कीलतेने भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलंय.
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांना मिश्कील टोला लगावला. “आमच्यासाठी अजित पवारांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्रानं पाहिला आहे. आमच्या बरोबर अजित पवार आले तेव्हा सत्तेचं काय झालं? अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली,” असं दरेकर यांनी म्हटले. दरेकरांच्या या वक्तव्यानंतर संबंधितांमध्ये हशा पिकला.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले होते. भाजपा आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा देत, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपाचे हे सरकार जास्त काळ तग धरु शकले नाही. केवळ दीड दिवसांत हे सरकार कोसळले होते. अजित पवारांनी पुन्हा काँग्रेस व शिवसेनेसोबत आपला सत्तास्थापनेचा घरोबा बसवला. यावरुन प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांच्या पायगुणामुळे आमचे सरकार गेल्याचं म्हटलंय.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाचे उमेदवार भाई गिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंधांसह सुरू झालेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपाने ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांना उमेदवारी दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले निलम गोऱ्हे यांचे अभिनंदन
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून, त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो असेही मुख्यमंत्री शुभेच्छापर भाषण करतांना म्हणाले.