“अजितदादांना शरद पवारांमुळेच राजकारणात संधी, ते मोठे नेते नाहीत”; भाजपचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 02:25 PM2021-09-21T14:25:38+5:302021-09-21T14:28:17+5:30
गेल्या काही महिन्यांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे.
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला. याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले. यातच आता अजित पवार मोठे नेते नाहीत, शरद पवार यांच्यामुळे ते राजकारणात आहेत, असे एका भाजप नेत्याने म्हटले आहे. (bjp nilesh rane criticized ajit pawar over chandrakant patil statement)
“पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका
चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला. यामध्ये आता भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली असून, अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
“काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”
अजित पवार मोठे नेते नाही
चंद्रकांत पाटील अजित पवारांवर बोलल्यावर नेमकेच राष्ट्रवादीवाले विस्कटले. अजित पवार मोठे नेते नाहीत, त्यांना मोठा नेता मानण्याचे कारण देखील नाही, त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
चंद्रकांतदादा अजित पवारांवर बोलल्यावर नेमकेच राष्ट्रवादीवाले विस्कटले. अजित पवार मोठा नेता नाही, त्यांना मोठा नेता मानन्याचं कारण देखील नाही, त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 21, 2021
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रीपद देऊ नये असा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता. देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात. राज्यात काय चाललय याबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका, शिवसेनेने सतत त्रास दिल्यानंतरही महाराष्ट्रात सलग पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहिले आहेत. तेव्हा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु देवेंद्र फडणवीस हे सर्वांना पुरुन उरले, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.