कॉंग्रेसच्या प्रदेश आणि मुंबई कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने, राहुल गांधी यांचा केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 06:04 PM2018-12-19T18:04:50+5:302018-12-19T18:06:06+5:30
आज मुंबई भाजपा ने अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयासमोर तीव्र निदर्शेने केली.
मुंबई - राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टता केल्यानंतरही कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी वारंवार भाजप सरकारवर खोटे, बिनबुडाचे, अतार्किक, आरोप करीत असल्याच्या निषेधार्थ आज मुंबई भाजपाने अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयासमोर तीव्र निदर्शेने केली. तर आमदार अॅड आशिष शेलार यांनी याबाबतचे राष्ट्रपतींना द्यावयाचे निवेदन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे सुपुर्द केले.
राहुल गांधी माफी मागो... राहुल गांधी शर्म करो.. ! सुप्रिम कोर्ट के निर्णय का कमाल.. राहुल का राफेल झूठ हुवा बेहाल..! राहुल का झूठ हारा राफेल का सच जीता! तसेच राहुल गांधी हाय.. हाय..! अशा घोषणा देत भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या मुंबईतील दोन्ही कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून आपला निषेध नोंदवला.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या निर्देशाप्रमाणे आज दुपारी दादर येथील कॉंग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयावर भाजपाच्या युवा मोर्चाच्या सुमारे दिड हजार कार्यकर्ते व पदाधिका-यांनी तीव्र निदर्शने केली. भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यामध्ये भाजपा आमदार योगेश सागर, तेजेंद्र सिंग, अमित शेलार यांच्यासह युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. घोषणांनी दादरच्या टिळक भवनचा परिसर दुमदुमून गेला होता.
तर भाजपा आमदार राज पुरोहित यांच्या नेतृत्वामध्ये भाजपाच्या शेकडो पदाधिका-यांनी कॉंग्रेसच्या आझाद मैदान येथील मुंबई कार्यालयावर निदर्शने केली. यामध्ये भाजपाचे आमदार, तमिल सेलवन, मुंबई महामंत्री सुनिल राणे, दक्षिण मुबई जिल्हा अध्यक्ष सिधार्थ गमरे, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार यांच्यासह भाजपा गटनेते मनोट कोटक, नगरसेवक आकाश पुरोहित, मकरंद नार्वेकर, रिटा मकवाना, नेहल शाह यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी संजिव पटेल, जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, नगरसेवक कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. हातात राहुल गांधी यांच्या निषेधाचे फलक आणि जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई भाजपातर्फे एक निवेदन देशाच्या राष्ट्रपतीना देण्यात आले असून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी या निवेदनाची प्रत दुपारी मुबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी त्यांच्या सोबत मुंबई महामंत्री सुमंत घैसास, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संतोष पांडे, मुंबई सचिव विमल भूता आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदानामध्ये कॉंग्रेसरकडून या प्रकरणी वारंवार खोटे आरोप करण्यात येत असल्याचा सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दुष्टीने हा विषय महत्वाचा असतानाही असेच न्यायालयाने त्यामध्ये स्पष्टता आणल्यानंतरही खा. राहुल गांधी हे देशातील जनेतेची दिशाभूल करीत आहेत. देशाच्या सुरक्षेबाबत हा त्यांनी जो खेळ सुरू केला आहे ही बाब चिंतेची असून या प्रकरणी राष्ट्रपतींनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
चोरोंको सब नजर आते है चोर - आशिष शेलार
चोरोंको सब नजर आते है चोर अशा शब्दात कॉंग्रेसचा खरपूस समाचार घेत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भाजप सरकारच्या बदनामीचे षडयंत्र कॉंग्रेसने असेच सुरू ठेवले तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. राहुल गांधी यांचा खोटारडेपणा आता देशाच्या जनतेसमोर उघड झाला असून त्यांनी या देशातील जनतेची जी दिशाभूल केली त्या प्रकरणी माफी मागावी. राफेल हा विषय देशाच्या सुरक्षेशी जोडलेला आहे त्यामुळे या विषयाचा असा खेळ मांडणा-या कॉंग्रेसला चोरोंको सब नजर आते हैं चोर अशी अवस्था झाली आहे अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला.