Maharashtra Politics: “पवार साहेब, शपथविधीच्या आदल्या रात्री अजित पवार आणि तुमच्यात काय सं‘वाद’झाला?”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 03:31 PM2023-02-14T15:31:04+5:302023-02-14T15:31:19+5:30
Maharashtra News: तुम्ही स्वतः BJP-NCP सरकार स्थापन करुया असा निरोप दिला होता, असा दावा भाजपने केला आहे.
Maharashtra Politics: भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर भाजपने ट्विट करत यावर पलटवार केला आहे. पवार साहेब, शपथविधीच्या आदल्या रात्री अजित पवार आणि तुमच्यात काय सं‘वाद’झाला? अशी विचारणाही करण्यात आली आहे.
निवडणूका होण्याच्या आधीपासूनच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे भाजपाला कट साइज बनवण्याचे षडयंत्र होते. निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला. तर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या चर्चा सुरु झाल्या. अशातच राष्ट्रवादीकडून सरकार स्थापन करण्याची ऑफर आली. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीबाबत गोष्टी ठरल्या. अजितदादा आमच्याकडे आले. त्यांनी जी शपथ घेतली, ती प्रामाणिकपणे घेतली होती. नंतर काय ठरले, ते तोंडघशी पडले, हे आपण सगळ्यांनी बघितले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले.
तुम्ही BJP-NCP सरकार स्थापन करुया असा निरोप दिला होता
भाजप महाराष्ट्रने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट्स केले आहेत. अहो शरद पवार, एक गोष्ट लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस सुज्ञ आहेत म्हणूनच आजपर्यंत शांत होते. तुम्ही स्वतः BJP - NCP सरकार स्थापन करुया असा निरोप दिला होता. पण, तुम्हाला जे हवे ते साध्य झाले नाही म्हणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत नेहमी सारख तुम्ही कोलांटी उडी घेतली. पवार साहेब, शपथविधीच्या आदल्या रात्री अजित पवार आणि तुमच्यात काय सं'वाद' झाला? अजित पवार तुम्हाला पहाटेच्या शपथविधीचा निरोप देण्यासाठी सिल्व्हर ओकवर आले होते. तुम्ही सकाळी केलेले ट्विट सुद्धा खोटे होते. अजित पवार तुम्हाला सांगून शपथविधीला आलेले, असे ट्विट करत भाजपने पलटवार केला आहे.
पवार साहेब, शपथविधीच्या आदल्या रात्री @AjitPawarSpeaks आणि तुमच्यात काय सं'वाद' झाला ?
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 13, 2023
अजित पवार तुम्हाला पहाटेच्या शपथविधीचा निरोप देण्यासाठी सिल्व्हर ओकवर आले होते.@PawarSpeaks , तुम्ही सकाळी केलेलं ट्विट सुद्धा खोटं होतं. अजित पवार तुम्हाला सांगून शपथविधीला आलेले.
(2/2)
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन ते अशा प्रकारची विधाने करतील, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"