मुंबई शहरावर भाजप, शिवसेनेचे वर्चस्व कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:57 AM2019-08-07T04:57:26+5:302019-08-07T04:57:46+5:30

काँग्रेस - राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई; एकुलती एक जागा राखण्याचे एमआयएमसमोर आव्हान

BJP, Shiv Sena dominated Mumbai city | मुंबई शहरावर भाजप, शिवसेनेचे वर्चस्व कायम

मुंबई शहरावर भाजप, शिवसेनेचे वर्चस्व कायम

Next

- गौरीशंकर घाळे 

मुंबई : शहर जिल्हा आणि उपनगर जिल्हा अशी मुंबईची महसुली विभागणी. यातील कुलाबा ते शीव आणि माहिमपर्य$ंतचा परिसर मुंबई शहर जिल्ह्यात येतो. तिथे बहुतांश ठिकाणी युती आणि आघाडीत थेट लढत असून एखाद-दुसऱ्या जागेवर मनसे आणि एमआयएममुळे तिरंगी किंवा चौरंगी लढत होऊ शकते.

सध्या मुंबई शहर जिल्ह्यातील माहिम, शिवडी आणि वरळी या तीन मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आहेत. तर सायन कोळीवाडा, मलबार हिल आणि कुलाबा या तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. युती अभेद्य वगैरे मानली जायच्या काळात ज्या पद्धतीने जागावाटप व्हायचे तसेच निकाल या सहा मतदारसंघांमध्ये लागले. त्याला कारण म्हणजे त्या आधीच्या काळात आपल्या मतदारसंघात मित्रपक्षाची घुसखोरी होणार नाही याची पुरेपूर काळजी संबंधित आमदार आणि पक्षांनी कायमच घेतली. २०१९ च्या जागावाटपात या सहा जागांबाबत युतीमध्ये कुरकुर होईल, अशी स्थिती सध्यातरी नाही.

एकट्या धारावीचा अपवाद सोडल्यास वडाळा, भायखळा आणि मुंबादेवी या तीन जागांवर शिवसेनेला मागे टाकत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले. कालिदास कोळंबकर काँग्रेसमध्ये दाखल झाल्यापासून इथे वडाळ्यात शिवसेनेला यश मिळाले नाही. उलट, २०१४ ला भाजपच्या नवख्या मिहिर कोटेचा यांनी दुसºया क्रमांकाची मते घेतली. आता कोळंबकर भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे ही जागा भाजपसाठी सोडावी, अशी मागणी होऊ शकते. भायखळ्यात भाजपच्या मधू चव्हाणांना अवघ्या १,३५७ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. तर, मुंबादेवीत अतुल शाह यांनी दुसºया क्रमांकाची मते घेतली होती. या दोन्ही जागांवर भाजप दावा करू शकते. अतुल शाह तर तयारीलासुद्धा लागले आहेत. मात्र, भायखळ्याची जागा सोडण्यास सेना नेतृत्व अनुकूल नाही. माजी मंत्री सचिन अहिर यांनी मनगटावरील घड्याळ बाजूला ठेवत हाती भगवा घेतला. वरळी नव्हेतर, भायखळ्यातून लढणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. त्यामुळे इथे युती विरुद्ध आघाडी विरुद्ध एमआयएमचे विद्यमान आमदार वारिस पठाण अशी लढत होणार हे नक्की झाले आहे.

तिकडे काँग्रेस आघाडीत जागावाटपावरून तणातणी होण्याची सुतराम शक्यता नाही. मुंबई शहरात वरळीचा अपवाद वगळता इतरत्र कोठेही राष्ट्रवादीचे अस्तित्व जाणवत नाही. वरळीची जागा राष्ट्रवादीकडे आणि उर्वरित काँग्रेस अशी आघाडीतील सरळसाधी वाटणी आहे. जागावाटप नाही, तर २०१४च्या तीन जागा राखण्याचे मोठे आव्हान काँग्रेस आघाडीसमोर आहे. सध्या आघाडीचे तीन आमदार आहेत. २००९ला सात होते. त्यामुळे धारावीत वर्षा गायकवाड आणि मुंबादेवीत अमिन पटेल असे दोनच आघाडीेचे शिलेदार शिल्लक आहेत. धारावीत आजही गायकवाडांची चलती असल्याचे लोकसभा निकालाने दाखवून दिले आहे. मुंबादेवी परिसरातील मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये भाजपकडून लाभार्थ्यांना गळास लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वरळीत शिवसेनेचे सुनील शिंदे आमदार आहेत. त्यांनी सचिन अहिरांना पराभूत केले होते, आता अहिरच शिवसेनेत आले आहेत. वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आदित्य रिंगणात उतरल्यास विरोधकच शिल्लक राहू नये, यासाठी अहिर यांना पक्षात आणल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसने भायखळ्याची जागा परत मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २००९ साली माहिम आणि शिवडीत मनसेचे इंजिन चालले. सध्या हे इंजिन रुळासकट घसरल्याचे चित्र आहे. भाजपच्या ताब्यातील कुलाब्यात राज पुरोहित यांच्यासमोर काँग्रेसचे भाई जगताप कामाला लागले आहेत. तर, मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा यांचे तगडे आव्हान मोडण्यासाठी काँग्रेसला तुल्यबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. सायन कोळीवाड्यात भाजपच्या तमिळ सेल्वन यांना पक्षांतर्गत आव्हानाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. प्रसाद लाड आणि राजेश शिरवडकर येथून प्रयत्नशील आहेत.

भाजप आणि शिवसेना मुंबई शहरातील आपले वर्चस्व कायम राखण्यात पाच वर्षांत यशस्वी ठरले आहेत. तर, धारावी आणि मुंबादेवी या जागा सध्यातरी आघाडीसाठी जमेच्या आहेत. मात्र, यापलीकडे जात आपली संख्या वाढविण्याचे, गतवैभव मिळविण्याचे आव्हान काँग्रेस आघाडीसमोर आहे. तर, भायखळ्याची जागा राखण्यासाठी एमआयएमला संघर्ष करावा लागेल. बाकी मनसेचे इंजीन सिग्नलची वाट पाहत सध्यातरी सायडिंगलाच आहे.

शिवडी, वरळी, वडाळा, माहिमसारख्या मतदारसंघात भाजपचा तर मलबार हिल, कुलाबा अशा मतदारसंघात शिवसेनेचा म्हणावा तसा प्रभाव नाही. २००९ साली शहरातील दहापैकी सात जागा शिवसेनेने लढविल्या होत्या. तर, केवळ तीन जागा भाजपकडे होत्या.

सध्याचे पक्षीय बलाबल
एकूण जागा १०
भाजप- ३
शिवसेना- ३
काँग्रेस- ३
एमआयएम- १

Web Title: BJP, Shiv Sena dominated Mumbai city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.