EVM विरोधी आंदोलनात भाजपा-शिवसेनेनेही यायला हवं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 11:39 AM2019-08-02T11:39:58+5:302019-08-02T12:22:08+5:30
अमेरिकेत ईव्हीएम मशीनची चीप बनत असेल तर त्यावर भारतीयांनी विश्वास कसा ठेवायचा?
मुंबई - ईव्हीएमवर शंका उपस्थित होत असल्याने आगामी निवडणुका बॅलेटवर घेण्यात याव्यात यासाठी मुंबईत आज विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी देशातील सध्याचं वातावरण पाहता निवडणुकांवर संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाकडून आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. यात भाजपा-शिवसेनेनेही आंदोलनात यायला पाहिजे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख आजच्या बैठकीला उपस्थित होते. पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आम्ही एक फॉर्म काढून ते लोकांकडून भरुन घेणार आहोत. निवडणुका बॅलेटपेपर घेण्यात याव्यात अशा मागण्यांचे फॉर्म सर्वपक्षीय कार्यकर्ते लोकांकडून भरुन घेतील. 21 तारखेला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अमेरिकेत ईव्हीएम मशीनची चीप बनत असेल तर त्यावर भारतीयांनी विश्वास कसा ठेवायचा? 371 मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत घोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी 1 लाख मतदान झाली आहे तिथे 1 लाख 15 हजार मते दाखविली जात आहेत. राजू शेट्टी असे नेते आहेत ज्यांना लोकं पैसे गोळा करुन निवडणुकीसाठी मतदान करतात मग त्यांना मते मिळू शकत नाही का असा सवाल करत विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्यास ही शंका दूर होण्यास मदत मिळेल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान ईव्हीएमविरोधी आंदोलनात कोणत्याही पक्षाचं नावं देण्यात आलं नाही. राज्यातील सर्व विरोधी पक्ष येणाऱ्या आंदोलनात रस्त्यावर उतरेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. आज झालेल्या विरोधकांच्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह, राष्ट्रवादी नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील, शिक्षक आमदार कपिल पाटील असे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.