भाजपाने प्रत्येक प्रेसनोटसोबत हाजमोला गोळ्या मोफत वाटाव्यात, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 03:08 PM2020-05-23T15:08:57+5:302020-05-23T15:11:04+5:30
आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी भाजपाला दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते
मुंबई - भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते. भाजपाच्या या हास्यास्पद दाव्याची पोलखोल करत यापुढे प्रेसनोटसोबत भाजपाने हाजमोला गोळ्या किंवा त्यांच्या पसंदीचे एखादे पाचक मोफत वाटावे, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, आंदोलनासंदर्भात भाजपाने संध्याकाळी ७.०९ वाजता काढलेल्या प्रेसनोटमध्ये राज्यभरातून अडीच लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते असा दावा केला आणि त्यानंतर ८.५६ वाजता काढलेल्या दुसऱ्या प्रेसनोटमध्ये अडीच लाख कुटुंब व ८,७५,४८७ लोक आंदोलनात सहभागी झाल्याचे म्हटले आहे. १ तास ४७ मिनिटात ६,२५,४८७ ने हा आकडा वाढल्याचे दाखवण्यात आले असून याचा मिनिटाचा हिशोब केला तर एका मिनिटात ५८४५.६७२८९७१ एवढा होत आहे. याच वेगाने भाजपाने गणित केले तर १५ दिवसानंतर अख्खा महाराष्ट्रच आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करता आला असता. आंदोलनाकडे लोकांनीच काय पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्याचे संबंध राज्याने पाहिले असताना भाजपाचा हा दावा पोकळ व हास्यास्पद असल्याचे दिसते. भाजपाला खोटे बोलण्याची सवयच लागलीय, सतत खोटे दावे करणे आणि नंतर तोंडावर आपटणे हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे.
कोरोनाच्या संकटात सरकारशी सहकार्य करुन एकजुटीचे दर्शन घडवण्याऐवजी भाजपाने केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेले नाही. परंतु गर्वाचा फुगा फुटला असतानाही त्यांना वास्तवाचे भान राहिलेले दिसत नाही. भाजपाची एकूण कृती पाहता ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला.