देश काँग्रेसमुक्त करून पाहणारा भाजपच काँग्रेसयुक्त पक्ष झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 03:51 AM2019-09-01T03:51:48+5:302019-09-01T03:51:53+5:30

सुप्रिया सुळे यांची टीका । सरकार कोणाचेही येवो मंत्री आमचेच असणार

The BJP, which had liberated the country from the Congress, became the Congress party | देश काँग्रेसमुक्त करून पाहणारा भाजपच काँग्रेसयुक्त पक्ष झाला

देश काँग्रेसमुक्त करून पाहणारा भाजपच काँग्रेसयुक्त पक्ष झाला

googlenewsNext

नवी मुंबई : भारत देश काँग्रेसमुक्त करू, अशी घोषणा केलेल्या भाजप पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना विविध आमिषे दाखवत पक्षात प्रवेश देणे सुरू केले आहे. त्यामुळे भाजप हा काँग्रेसयुक्त पक्ष झाल्याची टीका करीत भाजप पक्षाचे नाव बदलून काँग्रेस जनता पार्टी करावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. नेरु ळ येथे राष्ट्रवादीच्या माध्यमातून शनिवार, ३१ आॅगस्ट रोजी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

देशात मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद होत असून, अनेकांचे रोजगार गेले आहेत. राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येत असलेल्या रोजगार मेळाव्यांमधून तरु णांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असल्याचे सुळे म्हणाल्या. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज ठाकरे यांच्या टीव्ही, वर्तमान आणि सोशल मीडियावर ब्रेकिंग येत असून आम्ही सत्तेत नसलो तरी ब्रेकिंग आमच्याच असल्याचा टोला त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना लगावला. राज्य सरकारमध्ये २० ते २२ कॅबिनेट मंत्रिपदे असतात. अनेक नेत्यांना मंत्रिपदाची आमिषे देऊन भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे आमची सत्ता आली किंवा नाही आली तरी पक्षांतर केलेले आमचेच नेते मंत्री होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते राष्ट्रवादीतच असल्याचे सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी, नवी मुंबईच्या दगडांना शेंदूर फासून शरद पवार यांनी देव केले, त्यानंतर नागरिकांनीही त्यांना देव मानले; परंतु त्यांनी विश्वासघात केल्याची टीका त्यांनी नाईक यांच्यावर केली. गणेश नाईक यांच्या पुत्राने भाजपमध्ये प्रवेश केला असून आता त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाल्याची टीका त्यांनी केली. नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा राष्ट्रवादीच जिंकेल, असा विश्वास या वेळी पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी शासनाने अनेक कंपनी बंद केल्याने अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या माध्यमातून रोजगार देण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी नवी मुंबईतील नेत्यांना सर्व काही देऊनही त्यांनी पवारांची साथ सोडली आहे. नेते कोठेही गेले तरी पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीतच असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार, राष्ट्रवादीच्या उरण विधानसभेच्या महिला अध्यक्षा भावना घाणेकर, नगरसेविका सपना गावडे, चंदू पाटील, जी. एस. पाटील, राष्ट्रवादीचे नवी मुंबई प्रवक्ता अफसर इमाम, युवक अध्यक्ष राजेश भोर, नेरु ळ तालुका अध्यक्ष महादेव पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बºया
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. पक्षातील दिग्गज नेते आपल्या पुत्रांचा हट्ट असल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप आणि सेनेत प्रवेश करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करीत वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बºया, असे वक्तव्य केले. आम्ही मुली वंशाचा दिवा नसलो तरी स्वाभिमानी असून, आमच्या स्वार्थासाठी आपल्या वडिलांना कोणापुढे मुजरा करायला लावत नसल्याची टीका त्यांनी केली.

शरद पवारांच्या संतापावर सुळेंचे स्पष्टीकरण
अहमदनगरमधील श्रीरामपूर येथे शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली, या वेळी एका पत्रकाराने पवार यांना प्रश्न विचारला असता या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पवार प्रतिप्रश्न करीत भडकले. पवार यांचे रौद्र रूप पाहून सर्वच अवाक झाले. याविषयी स्पष्टीकरण देताना आजपर्यंत पवारांना आम्हीही इतके चिडलेले पाहिले नव्हते; परंतु एखाद्या प्रश्नाचे उत्तर मला द्यायचा नाही हे आधीच सांगितलेले असताना पाच वेळा तोच तोच प्रश्न विचारला गेला, तसेच एखाद्या प्रश्नाला उत्तर द्यायचे नसेल तर तितका अधिकार त्यांना आहेच, असे सुळे म्हणाल्या.

भाजप प्रवेशावरून नाईक परिवारात मतभेद?
माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नेरु ळ येथील रोजगार मेळाव्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी माजी खासदार संजीव नाईक सपत्नीक वाशी टोलनाका येथे गेले होते. त्यानंतर कार्यक्र मस्थळापर्यंत ते सुळे यांच्यासोबतच होते. याबाबत सुळे यांना विचारले असता त्यांनी, नाईक कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध असल्याने संजीव नाईक सपत्नीक वाशी येथे स्वागताला आले असल्याचे सांगितले. या दरम्यान, कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून संदीप नाईक जरी भाजपमध्ये गेले असले तरी गणेश नाईक आणि संजीव नाईक हे राष्ट्रवादीच राहतील, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला. यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: The BJP, which had liberated the country from the Congress, became the Congress party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.