फुटलेल्या दोन पक्षांच्या मदतीने भाजप गाठणार ५१% मते? मविआसमोर १८ टक्के मते वाढविण्याचे आव्हान  

By यदू जोशी | Published: April 18, 2024 07:16 AM2024-04-18T07:16:09+5:302024-04-18T07:16:29+5:30

भाजप-शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५०.८९ टक्के मते मिळविली होती.

BJP will reach 51% votes with the help of two split parties Challenge to increase 18 percent votes before MVA | फुटलेल्या दोन पक्षांच्या मदतीने भाजप गाठणार ५१% मते? मविआसमोर १८ टक्के मते वाढविण्याचे आव्हान  

फुटलेल्या दोन पक्षांच्या मदतीने भाजप गाठणार ५१% मते? मविआसमोर १८ टक्के मते वाढविण्याचे आव्हान  

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
: भाजप-शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५०.८९ टक्के मते मिळविली होती. आता शिवसेनेतून फुटून आलेली शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतून फुटून आलेला अजित पवार गट यांच्या मदतीने हा आकडा गाठण्याचे आव्हान भाजपसमोर आहेत. त्याच वेळी फुटीनंतर उरलेली उद्धवसेना आणि शरद पवार गट यांच्या मदतीने ५० टक्क्यांपार जाण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडून त्याचे चार पक्ष झाल्याने २०१९ च्या निवडणुकीतील मतदानाचे निकष २०२४ च्या निवडणुकीत लावता येत नाहीत. गेल्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून ३२.०५ टक्के मते मिळाली होती. आता ५० टक्क्यांपर्यंत जायचे तर त्यांना गेल्या वेळच्या तुलनेत १८ टक्के मते अधिक घ्यावी लागतील. 

‘नोटा’ला मिळाली होती ०.९१ टक्के मते 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४,८८,७६६ एवढे मतदान ‘नोटा’वर झाले होते. याचा अर्थ एकही उमेदवार पसंत नाही असे सांगणाऱ्यांची संख्या एकूण मतदानाच्या ०.९१ टक्के इतकी होती.   
 
वंचित फॅक्टर चालेल?
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीने जवळपास सात टक्के मते २०१९ च्या लोकसभेत घेतली होती आणि ती बाब भाजप-शिवसेना युतीच्या पथ्यावर पडली होती. तसे विभाजन यावेळी होणार का, यावरही बरेच काही अवलंबून असेल

२०१९ मधील मतदान असे झाले
पक्ष    लढलेल्या जागा    विजयी जागा मते    मतांचे प्रमाण

भाजप    २५    २३    १,४९,१२,१३९    २७.८४
शिवसेना    २३    १८    १,२५,८९,०६४    २३.५
राष्ट्रवादी    १९    ०४    ८३,८७,३६३    १५.६६ 
काँग्रेस    २५    ०१    ८७,९२,२३७    १६.४१
वंचित    ४७    ००    ३७,४३,५६०    ६.९२
(एक जागा एमआयएमने, तर एक अपक्षाने जिंकली होती.)

लोकसभेतील गणित विधानसभेत बिघडले होते 
- २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने तब्बल ४१ जागा जिंकल्या आणि त्यानंतर काहीच महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या युतीला दोनशेहून अधिक जागा मिळणार असे गणित त्यावेळी मांडले जात होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत वेगळेच घडले. 
- भाजपने २३ जागा जिंकताना १२२ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. मात्र, विधानसभेत १०५ जागा मिळाल्या. 
- शिवसेनेने लोकसभेच्या १८ जागा जिंकताना १०५ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती; पण विधानसभेत ५६ जागांवरच समाधान मानावे लागले. 
- युतीला लोकसभेत २२७ जागांवर मताधिक्य होते; पण विधानसभेत दोघांना मिळून १६१ जागा मिळाल्या.  
- लोकसभा निवडणुकीत चार जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला विधानसभेच्या २३ मतदारसंघांमध्येच आघाडी होती; पण विधानसभा निवडणुकीत त्यांना ५३ जागा मिळाल्या. 
- लोकसभा निवडणुकीत एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला केवळ २२ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी होती; पण विधानसभा निवडणुकीत त्यांचे ४५ उमेदवार विजयी झाले.

Web Title: BJP will reach 51% votes with the help of two split parties Challenge to increase 18 percent votes before MVA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.