मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला; शाई आणि दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 05:35 IST2024-12-20T05:34:18+5:302024-12-20T05:35:01+5:30
हल्लेखोरांना पांगविण्यासाठी लाठीमार; ४० जणांवर गुन्हा दाखल

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला; शाई आणि दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : फोर्ट येथील काँग्रेसच्यामुंबई प्रदेश कार्यालयावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी हल्ला करून खिडक्या, दरवाजे आणि खुर्च्यांची तोडफोड केली. पक्षाच्या नामफलकावर शाईफेक करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला.
काँग्रेस कार्यालयामध्ये नेते आणि कार्यकर्ते यांची बैठक सुरू होती. त्याचवेळी युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात आंदोलन सुरू केले.
आंदोलनादरम्यान काही भाजप कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसले. कार्यालयाबाहेरील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या प्रतिमांवर त्यांनी शाई फेकली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी घाबरले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले.
काँग्रेस पदाधिकारी मंदार पवार यांच्यावरही शाईफेक करण्यात आली आहे. पेवर ब्लॉकने कार्यालयाच्या काचा फोडल्या. हल्ला पूर्वनियोजित होता. लोकशाही पद्धतीचे आंदोलन नव्हते तर पोलिसांच्या आडून भाजपने हा हल्ला केला, असा आरोप पवार यांनी केला आहे.
काँग्रेसने खोटा व्हिडीओ व्हायरल करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या नावाने काँग्रेसवाले फक्त राजकारण करतात. त्यामुळे काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी करीत आम्ही संविधानाने दिलेल्या हक्कानुसार आंदोलन केले, असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला.
हल्लेखोरांना अटक करा
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला. त्याबद्दल माफी मागण्याऐवजी भाजप गुंडगिरी करत आहे. मुंबई कार्यालयावर झालेला हल्ला हा सत्तेचा माज आहे. कोणी आमच्यावर हल्ला करत असेल तर गप्प बसणार नाही. सरकारने तत्काळ या गुंडांवर कारवाई करावी अन्यथा परिणामाला सरकारच जबाबदार असेल. - खा. वर्षा गायकवाड, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस
४० जणांवर गुन्हा दाखल
काँग्रेस भवनचे कार्यकारी अध्यक्ष मंदार पवार यांच्या तक्रारीवरून तेजिंदर तिवाना आणि भाजपच्या इतर ३० ते ४० जणांविरुद्ध आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.