राहुल गांधींच्या विरोधात भाजयुमो मुंबईचा प्रतिकार मोर्चा
By मनोहर कुंभेजकर | Published: November 18, 2022 06:02 PM2022-11-18T18:02:16+5:302022-11-18T18:03:12+5:30
आंदोलनाची माहिती मिळताच भाजयुमोचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात जाऊ नयेत म्हणून पोलीस दलाने काँग्रेस भवन कार्यालयात बंदोबस्त ठेवला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या तरुणांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालय टिळक भवनावर आज निषेध मोर्चा काढला. भारत देश वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सदर मोर्चा काढला.
आंदोलनाची माहिती मिळताच भाजयुमोचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात जाऊ नयेत म्हणून पोलीस दलाने काँग्रेस भवन कार्यालयात बंदोबस्त ठेवला होता. टिळक भवन काँग्रेस कार्यालयापासून काही मीटर अंतरावर पोलिसांनी त्यांना अटक केली.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, भारत जोडो यात्रेतील पीआर स्टंटमुळे राहुल गांधींना पहिल्यांदाच इतके चालावे लागले की, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन राहुल गांधी वीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. हा एका महान क्रांतिकारकाच्या बलिदानावरचा हल्ला आहे, हा मराठी अभिमानावरचा हल्ला आहे आणि प्रत्येक सच्च्या भारतीयाच्या भावनांवरचा हल्ला आहे. हा देशाचा अपमान आहे. पण हे ज्यांच्या नसात भारतीय रक्त वाहते तेच समजू शकेल,त्यांना वीर सावरकरांचे बलिदान कसे कळणार
असा टोला त्यांनी लगावला.
खेदाची गोष्ट म्हणजे हिंदुत्वाचा अभिमान बाळगणाऱ्या आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेही मराठी अभिमानावरील या हल्ल्याबाबत मौन बाळगून आहेत. महाराष्ट्रातील जनता हा अपमान सहन करणार नाही. आमची मागणी आहे की राहुल गांधी यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांचा पीआर स्टंट दौरा तात्काळ थांबवावा अशी मागणी तेजिंदर सिंग तिवाना यांनी केली