संविधान मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:43 AM2019-12-12T05:43:28+5:302019-12-12T06:20:36+5:30
नागरिकता विधेयकाविरोधात काँग्रेसचे आंदोलन
मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानविरोधी असून लोकशाहीला अभिप्रेत नाही. या विधेयकांच्या माध्यमातून भाजप सरकारने संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी केली.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने बुधवारी धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनाच्या सुरुवातीला संविधानाच्या सरनाम्याचे सर्वांनी वाचनदेखील केले. या वेळी थोरात म्हणाले, भाजप सरकारला संविधानाची तमा राहिली नाही. हे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करीत आहे. या देशाची धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे.
मतांच्या राजकारणासाठी भाजप सरकार संविधानाची पायमल्ली करीत आहे. काँग्रेस याचा तीव्र निषेध करीत असून भाजप सरकारविरोधात तीव्र लढा उभारून काँग्रेस हा डाव हाणून पाडेल.तर, प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी हे विधेयक सर्वोच्च न्यायालयात टिकणार नसल्याचा दावा केला. तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस पक्ष कडाडून विरोध करणार आहे. मुंबई शहरात ठिकठिकाणी धरणे आणि निदर्शने करू, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिला.
या आंदोलनात आमदार वर्षा गायकवाड, अस्लम शेख, अमिन पटेल, झिशान सिद्दिकी, माजी आमदार चरण सिंग सप्रा, मधू चव्हाण, प्रवक्ते सचिन सावंत, वीरेंद्र बक्षी, राजेश ठक्कर, संदीप शुक्ला, संदेश कोंडविलकर, महेंद्र मुणगेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.